यशवंतराव भोसले स्कूलमध्ये अनोखा 'ग्रँड पेरेंट्स डे '

Edited by: विनायक गांवस
Published on: February 15, 2025 13:03 PM
views 271  views

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये 'व्हॅलेंटाईन डे' चे औचित्य साधून आजी-आजोबांविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी 'ग्रँड पेरेंट्स डे 'साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन उपस्थित आजी-आजोबांच्या हस्ते दीप-प्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियांका डिसोझा, प्री-प्रायमरी इन्चार्ज उमा झारापकर, शिक्षिका प्रीती डोंगरे, श्वेता खानोलकर, अंजना वैद्य उपस्थित होत्या. आजकालची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडील नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची जबाबदारी आजी-आजोबांवर असते. शाळेव्यतिरिक्त घरातला जास्त वेळ ते आजी-आजोबांसोबत घालवतात. आजी-आजोबा आणि नातवंडं यांचं नातं विलक्षण असतं. ते नातवंडांचे पहिले मित्र असतात आणि नात्याची खरी जडण-घडण तिथूनच होत असते.मुलांना त्यांच्या आजी आजोबांविषयी कृतज्ञता व्यक्त करता यावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी आजी-आजोबांसाठी विविध स्पर्धा, खेळ, संगीत, गाणी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उपस्थित आजी-आजोबांनी यामध्ये उत्साहाने सहभागी होत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

शाळेने हा उपक्रम राबवून आमच्या जीवनात आनंद वाटण्याचे काम केले असे मनोगत अनेक जणांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन उमा झारापकर यांनी केले. या कार्यक्रमामुळे मुले आणि आजी-आजोबांमधील नात्यासोबतच एकत्रित कुटुंबाचे महत्त्वही अधोरेखित झाले.