![](https://kokansadlive.com/uploads/article/17271_pic_20250215.1946.jpg)
देवगड : देवगड तालुक्यातील जामसंडे येथील तालुका भाजप कार्यालयात शनिवारी दुपारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार ॲड. अजित गोगटे यांनी जामसंडे येथील पत्रकार परिषदेत देवगडचे लोकप्रिय माजी आमदार स्व.आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप समारंभ १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. जामसंडे येथील इंदिराबाई ठाकुर क्रीडानगरी येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभासाठी भारत सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती दिली. जामसंडे येथील तालुका भाजप कार्यालयात शनिवारी दुपारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ॲड .अजित गोगटे बोलत होते.
ॲड .अजित गोगटे म्हणाले, माजी आमदार कै. आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १५ फेब्रुवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोप कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नीतेश राणे,माजी राज्यमंत्री भाई गिरकर आमदार दीपक केसरकर, माजी आमदार प्रमोद जठार, गुहागरचे माजी आमदार विनय नातू, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना आमदार नीलेश राणे आदी दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. कै. आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून यावर्षी भाजपचे ज्येष्ठ सदस्य पु. ज. तथा काका ओगले यांना कै. आप्पासाहेब गोगटे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.आप्पासाहेब गोगटे हे भाजप- शिवसेना युतीचे आमदार होते. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात त्यांच्यासमवेत काम केलेल्या भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाही या समारोप कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांच्यासाठी कार्यक्रमस्थळी विशेष बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. आप्पासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या ‘स्मृतिगंध’ या स्मरणिकेचे प्रकाशन व कै. आप्पासाहेब गोगटे यांचे सुपूत्र प्रकाश गोगटे यांनी काढलेल्या स्मरणिकेचे प – काशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे, असेही अॅड. गोगटे यांनी सांगितले.
यावेळी बाळ खडपे, तालुकाध्यक्ष राजेंद्र शेट्ये, प्रकाश गोगटे, अॅड. अभिषेक गोगटे, वैभव बिडये, देवगड प्रभारी संतोष किंजवडेकर, जि. प. माजी सदस्य संजय बोंबडी, भाजप युवामोर्चाचे देवगड-जामसंडे शहर अध्यक्ष दयानंद पाटील, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, माजी नगरसेवक राजेंद्र वालकर, नरेश डामरी, कौस्तुभ जामसंडेकर, बंड्या भडसाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.