महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे दुर्दैवी निधन ; असनिये गावात शोककळा !

Edited by: प्रतिनिधी
Published on: February 04, 2023 18:11 PM
views 353  views

बांदा : बांदा येथील खेमराज हायस्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी क्रांती कृष्णा नाईक (वय १६, रा. असनिये) हिचे शुक्रवारी रात्री दुर्दैवी निधन झाले. तीला उच्च मधुमेहाचा त्रास होता. प्रशालेत ती हुशार विद्यार्थिनी म्हणून परिचित होती. आजारी असूनही ती कायम प्रशालेत येत असे.

गुरुवारी सकाळी तिला प्रशालेत असताना त्रास जाणवला. शिक्षकांनी ताडीने तिला डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले. त्यानंतर ती घरी गेली. मात्र त्रास कमी झाला नाही. नातलगांनी अधिक उपचारासाठी तिला खासगी डॉक्टरांकडे दाखल केले. तरीही त्रास कमी न झाल्याने तिला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारा दरम्यान तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने  तिला बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारांना तिच्या प्रकृती साथ मिळत नव्हती. अखेर शुक्रवारी रात्री  तिची प्राणज्योत मालवली.

क्रांती ११ वी कला शाखेत शिकत होती. अत्यंत प्रेमळ, अभ्यासू अशी तीची ओळख होती. बांदा प्रशालेच्या मुख्याध्यापिका एम. एम. सावंत यांनी असनिये येथे  तिच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. बांदा प्रशालेतही  तिला श्रद्धांजली वाहण्यात आली.  तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहिण असा परिवार आहे. क्रांतीच्या निधनाने असनिये गावावर शोककळा पसरली आहे.