
सावंतवाडी : सैनिक पतसंस्थेच्या माध्यमातून 'सैनिक पतसंस्था आपल्या गावी ' हा उपक्रम राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत दरवर्षी ३०० ते ४०० गावांच्या माध्यमातून ६ ते ७ हजार ग्राहक पतसंस्थेशी जोडले जातील असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर 'सन्मान नारीशक्तीचा ' या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सबलीकरण व सक्षमीकरण अंतर्गत महिलांना कर्ज पुरवठा व स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे. तसेच आगामी पाच वर्षात जिल्ह्यातील ५०० ते ७०० युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट पतसंस्थेच्या माध्यमातून ठेवण्यात आले असल्याची माहिती सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी दिली.सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'कुटुंबाची आर्थिक सक्षमता हीच आमची प्राथमिकता ' असे ब्रीद घेऊन पुढील काळात आम्ही काम करणार आहोत असेही ते म्हणाले.'सैनिक पतसंस्था आपल्या गावी ' या उपक्रमांतर्गत दरवर्षी २० प्रमाणे गाव जोडत जाऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराघरात सैनिक पतसंस्था पोहोचविण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. व्हीजन २०३० अंतर्गत २०३० पर्यंत या संस्थेचे डिपॉझिट तब्बल ७०० ते ८०० कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
सैनिक पतसंस्थेच्या जिल्ह्यात २० शाखा असून या २० शाखांच्या माध्यमातून वीस गावांची निवड करण्यात येणार आहे. त्या २० गावांमधील महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सन्मान नारीशक्तीचा या माध्यमातून पतसंस्थेच्या हिरकणी कर्ज योजनेतून महिलांना ३ ते ५ लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून देत त्यांना स्वयंरोजगार करण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. यामधून महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण हा पतसंस्थेचा उद्देश असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.त्याचप्रमाणे जिल्ह्यातील युवक युवतींसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. यासाठी प्रत्येक गावामध्ये पतसंस्थेचे एजंट नियुक्त करणार आहेत. त्या माध्यमातून पतसंस्थेच्या विविध योजना मार्केटमध्ये पोहोचविण्याचे काम केले जाणार आहे. या द्वारे आगामी पाच वर्षात जिल्ह्यातील ५०० ते ७०० युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद तावडे आदी उपस्थित होते.