
'सॉफ्ट कॉर्नर' कोणालाच नाही
मालवण : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ तसेच सुधारणा अधिनियम २०२१ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने कंबर कसली आहे. राज्यातील सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी नौकांवर कडक कारवाई करण्यासाठी सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने नियमित गस्त सुरू करण्यात आली आहे. अनधिकृत एलईडी आणि पर्ससीन मासेमारीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी अंमलबजावणी अधिकाऱ्यांची विशेष पथके तयार करून सातत्याने कारवाईचा बडगा उगारला जात आहे अशी माहिती सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांनी दिली.
प्रशासनाने या बेकायदेशीर मासेमारीची गंभीर दखल घेतली असून अत्यंत सतर्कतेने पावले उचलली आहेत. मत्स्य व्यवसाय विभागाकडून केवळ किनारपट्टी भागातच नव्हे, तर थेट खोल समुद्रात जाऊन महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात मासेमारी नौकांची कसून तपासणी केली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाने एका महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष वेधले आहे. सध्या सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवर अनेकदा एलईडी मासेमारीचे जुने फोटो अथवा नाईट व्हिजनमध्ये काढलेले जुने फोटो प्रसारित केले जात आहेत. असे फोटो पसरवून विभागाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही घटकांकडून होत असल्याचे समोर आले आहे.
सध्या मासेमारी हंगाम समाप्तीचा कालावधी जवळ आला आहे. मे महिन्याच्या अखेरीस येणारे खराब हवामान, समुद्रातील उंच लाटा आणि वादळी वाऱ्यांमुळे रात्रीच्या वेळी समुद्रात गस्त घालणे अत्यंत आव्हानात्मक आणि जोखमीचे ठरत आहे. असे असतानाही, मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी व कर्मचारी जिवाची पर्वा न करता नियमित गस्त घालत आहेत.
सध्या चालू हंगामाचे शेवटचे केवळ १० दिवस उरले असल्याने अनेक मासेमारी नौका आधीच बंद झाल्या आहेत, तर मोठ्या प्रमाणावर खलाशी आपल्या मूळ गावी परतण्याच्या तयारीत आहेत. मात्र, असे असले तरीही कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर मासेमारीला अजिबात मुभा दिली जाणार नाही किंवा त्यांच्याबाबत कोणताही 'सॉफ्ट कॉर्नर' ठेवला जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
प्रादेशिक हवामान विभागाकडून वेळोवेळी समुद्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत असते. हवामान विभागाच्या या इशाऱ्यांची दखल घेऊन, जोपर्यंत समुद्रातील हवामान अनुकूल होत नाही, तोपर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही मासेमारी नौकांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत कडक गस्त ठेवून अनधिकृत एलईडी व पर्ससीन मासेमारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व कठोर कारवाई सातत्याने करण्यात येईल.असेही श्री. कुवेसकर यांनी स्पष्ट केले आहे.










