
मुलींची छेडछाड प्रकरण
कणकवली : परप्रांतीय युवकांनी अल्पवयीन मुलींची छेड काढल्याच्या कणकवली शहरातील घटनेबाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी शहरविकास आघाडीचे नगरसेवक, नगरसेविका व शहरातील अन्य महिलांसह पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांची भेट घेतली. या प्रकरणाचा सखोल तपास करावा. शहरात कामानिमित्त येणार्या परप्रांतियांची पोलिसांनी माहिती ठेवावी. सुरक्षेच्या दृष्टीने कणकवली शहरभर सीसीटीव्ही कार्यान्वित करावे, यासह विविध मागण्या पारकर यांनी केल्या. तर परप्रांतिय ज्यांच्याकडे काम करतात अशा सर्व मालकांची पोलीस ठाण्यात बैठक आयोजित करणार असल्याचे नलावडे यांनी सांगितले.
याप्रसंगी नगरसेवक बाळू पारकर, नगरसेविका सुमेधा अंधारी, जाई मुरकर, दीपिका जाधव, शीतल मांजरेकर आदी उपस्थित होते. पारकर म्हणाले, शहरात जे परप्रांतीय काम करत आहेत, त्यांचे 'डिटेल्स' पोलिसांकडे असणे आवश्यक आहे. याबाबत त्यांच्या मालकांनाही सूचना द्या. पोलिसांचा धाक असायलाच हवा. घडल्या प्रकारामुळे शहरात तणाव असून हे वातावरण निवळायला हवे, त्यासाठी पोलिसांची भूमिका महत्वाची आहे. जमावाकडून संतापाच्या भरात मारहाणीचे कृत्य झाले, हे खरे आहे. मात्र, इथे कायदा आहे, याची जाणिव सर्वांनाच व्हायला हवी, असे पारकर म्हणाले.
शहरात सीसीटीव्ही बसविण्याची गरज उपस्थित महिलांनी व्यक्त केली. तर याबाबात लावकरच कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन नलावडे यांनी दिले.










