पिंगुळी मठात प. पू. विनायक अण्णा महाराजांची ५ वी पुण्यतिथी

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले समाधीचे दर्शन
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: May 16, 2026 19:50 PM
views 57  views

कुडाळ : पिंगुळी येथील ऐतिहासिक व पवित्र प. पू. राऊळ महाराज मठात आज परम पूज्य विनायक अण्णा महाराज यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विशेष उपस्थिती लावून प. पू. राऊळ महाराज यांच्या पावन समाधी स्थळाचे दर्शन घेतले व दर्शन सोहळ्याचा लाभ घेतला.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, "राऊळ महाराजांच्या आशीर्वादासाठी आमचे राणे कुटुंबीय पिढ्यानपिढ्या नेहमीच मठात येत राहिले आहे. या मठात पाऊल ठेवताच नेहमीच एक अलौकिक आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळते. यापूर्वीही मठाच्या विविध विकासकामांसाठी राणे कुटुंबीय आणि दीपक केसरकर यांचे मोलाचे योगदान राहिले असून, तोच सेवा आणि विकासाचा वारसा मी पुढे चालू ठेवेन," अशी ग्वाही त्यांनी दिली.

या सोहळ्याचे औचित्य साधून प. पू. अण्णा महाराज यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांना विशेष शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.

प्रशासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या भव्य धार्मिक सोहळ्याला प्रशासकीय अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील, कुडाळचे गटविकास अधिकारी (BDO), कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, माजी उपसभापती सीताराम तेली, पंचायत समिती सदस्या अर्चना घावनळकर, तसेच स्थानिक नेते बंड्या सावंत, राजू राऊळ, पप्या तवटे आदी मान्यवर उपस्थित होते. या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यासाठी पिंगुळी व परिसरातील शेकडो भाविकांनी मठात गर्दी केली होती.