
सावंतवाडी : मळगांव ग्रामपंचायतचे सदस्य लक्ष्मण केशव गावकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून केलेल्या अनधिकृत बांधकामामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात यावे व केलेले अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्यात यावे असा अर्ज मळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते हनुमंत पेडणेकर यांनी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद यांच्याकडे केला होता. त्यानुसार ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी दिनांक ३ जून २०२४ रोजी सदर बाबत चौकशी करून त्याचे संपूर्ण अवलोकन करून योग्य ती कारवाई करावी, असे आदेश पत्रामध्ये दिलेले होते. परंतु सदर बाबत कोणत्याही प्रकारची चौकशी तथा कारवाई न झाल्यामुळे त्यांनी येथील तहसीलदार कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनी उपोषण छेडले.
या उपोषणाला सायंकाळी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी भेट दिली. तहसीलदार कार्यालयाकडून ६८ हजार रुपये दंडाची कारवाईची नोटीस बजावलेली आहे.तसेच कारणे दाखवा नोटीस देखील देण्यात येणार आहे. नियमोचित कागदपत्रे व योग्य त्या परवानग्या जसे की अन्नभेसळ विभागाची परवानगी, अग्निशामन दलाची परवानगी, इमारतीची जागा बिनशेती करणे, हॉल साठी लागणाऱ्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून घेण्याकरिता नोटीस देऊ, असे तहसीलदार यांनी सांगितले.
ही सर्व कामे त्या त्या विभागाकडून पूर्ण करून घेण्यात येतील व तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. असे आश्वासन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी हनुमंत पेडणेकर यांना दिल्यानंतर त्यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले. यावेळी सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, माजी सभापती राजू परब, माजी सरपंच स्नेहल जामदार, माजी सरपंच निलेश कुडव, गणेशप्रसाद पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्या निकिता राऊळ, अनुष्का खडपकर, माजी सरपंच निलेश कुडव, गणेशप्रसाद पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते दीपक जोशी, बाळा बुगडे, प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.उपोषण प्रसंगी तळवडे ग्रामपंचायत सदस्य दादा परब, मळगांव ग्रामस्थ दीपक जोशी, निलेश राऊळ, अमर वेंगुर्लेकर, मंगल पेडणेकर, सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ सदस्य राजेंद्र बिर्जे, नंदकिशोर कोंडये, सिद्धार्थ पराडकर, प्रकाश जाधव, विनय पेडणेकर, प्रतीक हरमलकर, रुपेश सावंत, पांडुरंग हळदणकर निळकंठ बुगडे, पांडुरंग राऊळ, पांडुरंग नाटेकर, प्रकाश राऊळ, हरिश्चंद्र आसयेकर, शैलेंद्र पेडणेकर यांनी देखील भेट दिली.