आंबोलीत अनधिकृत बांधकाम ; महिलांचा मंत्री केसरकरांना घेराव !

Edited by: भरत केसरकर
Published on: March 04, 2024 05:28 AM
views 336  views

सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना रविवारी रात्री आंबोलीतील संतप्त महिलांनी घेराव घातला. आंबोलीत वन जमिनीच्या जागेत अनधिकृत बांधकाम झाल्याच्या मुद्द्यावरून येथील ग्रामस्थ 18 दिवस उपोषणास बसले आहेत. आंबोलीतील जंगलात काळोखात हे ग्रामस्थ आंदोलन करत आहेत.आंबोलीत कबूलायतदार गावकर प्रश्न असताना बाहेरील लोकांना अतिक्रमण करून तब्बल २७ बंगले बांधले आहेत.यावरून ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्यात दीपक केसरकर काल रात्री या उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना रोषास सामोरे जावे लागले.

       आंबोलीतील महाराष्ट्र सरकार व इतर हक्क वनखाते असलेल्या सरकारी जमिनीवर अतिक्रमणे करून रिसॉर्ट उभे करून बेकायदेशीर बंगले बांधले आहेत. हे बंगले अनधिकृत असून राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या आशिर्वादाने सर्व चालले असल्याचा आरोप ग्रामस्थानी केला आहे.

    हे रिसॉर्ट बांधताना स्थानिक महसुल व वन अधीका-यांना हाताशी धरून हे बांधकाम केले असल्याचा आरोपही येथील ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे हे बांधकाम हटवण्याच्या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. हे बांधकाम तोडण्यात येत नाही तो पर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला होता. 

    याची दखल घेत खासदार विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी व महसूल विभागाला तत्काळ बांधकाम तोडण्या संदर्भात लेखीपत्र दिले होते.आंबोली येथे वनविभागाच्या जमिनीत उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ निष्कासित करण्यात यावीत, तशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात यावे, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी राज्याचे प्रधान सचिव यांच्याकडे केली आहे. या ठिकाणी तब्बल १३ एकर जमीन २७ मोठ मोठे बंगले बांधण्याचे नियमबाह्य काम करण्यात आले आहे.असा आरोप होत आहे..या बेकायदेशीर बांधकामाबाबत सुरू असलेल्या गावकरी यांच्या आंदोलनावर खासदार विनायक राऊत यांनी पाठींबा दिला आहे.

   काल रात्री उपोषणाच्या 18 व्या दिवशी दीपक केसरकर यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी स्थानिक आमदार म्हणून तुम्ही ही बांधकाम कधी काढणार? असा प्रश्न विचारत केसरकर याना जाब विचारला. यावेळी जवळजवळ 50 ते 60 महिलांनी दीपक केसरकर यांचा मार्ग रोखून धरला होता. यावेळी दीपक केसरकर यांना पोलीस बंदोबस्तातून तिथून काढता पाय घ्यावा लागला.ते तिथून निघून गेले आणि गाडीत बसून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान यानंतर दीपक केसरकर यांनी अनधिकृत झालेले बांधकाम लवकरात लवकर पाडण्याचे आदेश आपण देऊ अशा पद्धतीची माहिती दिली.तर या संदर्भात सोमवारी लवकर तहसिलदार यांना कोर्टात कॅव्हेट दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.तर या संपूर्ण प्रकरणात आंबोलीतील महिला आणी ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले होते.तर या संपूर्ण प्रकरणात खासदार विनायक राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

     तर दीपक केसरकर यांनी मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपवनसंरक्षक यांना तातडीने मुंबईत मंत्रालयात बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.