गद्दारच राहणार !

मंत्री केसरकरांचं नाव न घेता ठाकरेंचा टोला
Edited by: विनायक गांवस
Published on: February 04, 2024 08:15 AM
views 39  views

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा सावंतवाडीत होत आहे. मोठ्या संख्येने उबाठा शिवसेनेचे सैनिक उपस्थित राहिले आहेत. कोंबडी चोराची पीस तुम्हीच उपटली आहेत‌. उरली सुरली पण उपटून टाका अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली.

आज कुटुंब संवाद करायला आलो आहे‌. अनपेक्षितपणे मी मुख्यमंत्री झालो. आपल्याकडे मन की नाही, दिलं की बात आहे‌. आमच्या हृदयात राम आणि हाताला काम आहे. मी बांद्यापासून चांद्यापर्यंत जाणार आहे. शिवसेना कुणाची हे विचारायला मी आलो आहे. इथला डबल गद्दार, हा कलंक ते पुसू शकत नाही. दर आठवड्याला शिर्डीला जाणारा, श्रद्धा-सबुरी मानणारा माणूस वाटला होता. तांदळाचा किस्सा भास्कर जाधवांनी सांगितला. गद्दारी नसानसात भिनलेला गद्दारच रहाणार असा टोला त्यांनी दीपक केसरकर यांच नाव न घेता लगावला. 

विनायक राऊतना निवडून दिलत म्हणून कोकण आज वाचल. एक वळवळ आहे ती पण साफ करून टाका. लादी चकचकीत केली तशी झाडू घेऊन सगळी घाण साफ करायची आहे. सावंतवाडीतही करायची आहे. आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांनी ती केली आहे‌. येणाऱ्या निवडणुकीत देखील ती आपणास करायची आहे. गणपत गायकवाडांनी का गोळीबार केला ? हे समोर आलं पाहिजे. मिंदेंमुळे गुंडांची पैदास होईल असं त्यांचं मत आहे‌. त्यांची बाजू घेणार नाही पण वस्तुस्थिती कळली पाहिजे. गणपत गायकवाडांनी कबुली ही दिलेली आहे. त्यामुळे आता पाहू मोदी गॅरंटी कुणाला पावते‌ असंही ते म्हणाले.


यावेळी खासदार विनायक राऊत,आ. भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक, आ. रमेश कोरगांवकर, दत्ता दळवी, गौरीशंकर खोत, अरूण दुधवडकर, शैलेश परब, वरूण सरदेसाई, मिलींद नार्वेकर, अतुल रावराणे, संदेश पारकर, जान्हवी सावंत, सतिश सावंत, संजय पडते, बाबुराव धुरी, रूपेश राऊळ, बाळू परब, राजू नाईक, मंदार शिरसाट, सुशांत नाईक, बाळा गावडे, मायकल डिसोझा आदी उपस्थित होते.