कणकवलीत उद्या ठाकरेंचा आवाज घुमणार !

लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 03, 2024 10:10 AM
views 205  views

कणकवली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंवाद यात्रेनिमित्त कोकण दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गर्जना उद्या रविवार 4 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा खुद्द कणकवली शहरात उपजिल्हा रुग्णालयासमोर सायंकाळी 5 वाजता होणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, कन्हैया पारकर आदी उपस्थित होते.

कणकवलीत 4 फेब्रुवारी होणारी जाहीर सभा म्हणजे लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार असल्याचे मानले जात असून उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेमुळे शिवसैनिकांत प्रचंड उत्साह संचारला आहे. रविवारी 4 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता गांधीचौक सावंतवाडी येथे कॉर्नर सभा, कुडाळ जिजामाता चौक येथे कॉर्नर सभा घेऊन जनतेशी संवाद साधतील. दुपारी 3 वाजता मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज मंदिरातील सिंहासन आणि मंदिर नूतनीकरण चे शिवप्रेमींना लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर 5 वाजता आंगणेवाडी भराडीदेवीचे दर्शन घेऊन सायंकाळी 6 वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर जाहीर सभेत संबोधित करणार आहेत. 5 फेब्रुवारी रोजी राजापूर धूतपापेश्वर मंदिरात दर्शन घेऊन रत्नागिरी आठवडा बाजार ठिकाणी जनतेशी संवाद साधणार आहेत.

त्यानंतर मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी देखील करणार आहेत. त्यानंतर चिपळूण मधील जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.