
मुंबई : उद्धव ठाकरेंनी कोकण दौरा सुरु केला असून, पहिल्याच दिवशी त्यांना धक्का बसला आहे. तब्बल 25 वर्षं आमदार राहिलेल्या सूर्यकांत दळवी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. सूर्यकांत दळवी यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सूर्यकांत दळवी भाजपात प्रवेश कऱणार असल्याची चर्चा रंगली होती. आज अखेर पक्षप्रवेशाने त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
दापोली मतदारसंघाचे सलग पाच वेळा आमदार राहिलेले सूर्यकांत दळवी हे पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. यामुळे ते पक्ष सोडून भाजपात जाणार असल्याचं बोललं जात होतं. कोणताही निर्णय घेताना सूर्यकांत दळवी यांना विश्वासात घेतलं जात नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती.