मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे लोकांच्या दारोदारी फिरतायत

खासदार नारायण राणे यांची टीका
Edited by: मनोज पवार
Published on: September 16, 2024 10:20 AM
views 143  views

चिपळूण : बाळासाहेब ठाकरे कधी कोणाच्या घरी गेलेले नाहीत, मात्र मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे लोकांच्या दारोदारी फिरत आहेत, अशी टीका रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांनी आज चिपळूण येथे केली. शिवसेनेची राज्यात सत्ताच येणार नाही मग उद्धव ठाकरे सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन कुठून देणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

चिपळुणमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देण्यासाठी खासदार राणे आज चिपळूणला आले होते. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केले होते

उद्धव ठाकरे यांनी आज सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन दिले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केली जाईल असे सांगितले. त्यावर राणे म्हणाले, राज्यात शिवसेनेची सत्ता येणारच नाही, मग ते सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन कुठून देणार. ठाकरेंना बजेट कळत नाही. ते मुख्यमंत्री असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी मला बजेट कळत नाही अशी कबुली ठाकरे यांनी दिली होती.

संजय राऊत आणि उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नव्हे. सकाळी उठल्यापासून टीका करण्यापलीकडे राऊत यांना दुसरी कामे नाहीत. त्यांनी देश हिताचा कुठला मुद्दा मांडला का? असे दाखवून द्यावे. आपल्यापेक्षा पदाने मोठ्या माणसावर टीका करायची नसते, मात्र आदित्य ठाकरे गुणवत्ता नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करीत आहेत. ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात केवळ दोनदा मंत्रालयात गेले आणि अडीच वर्षाचे मानधन घेतले, अशी टीकाही त्यांनी केली.

महायुतीच्या जागावाटपावर राणेंचे मौन 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटप विषयावर राणे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मौन पाळले. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रत्येकी तीन तीन पक्ष आहेत. अजून कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराची घोषणा झालेली नाही अजून चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता बोलणे योग्य नाही वेळ येईल तेव्हा बोलू, असे राणे यांनी सांगितले.