उमेदवारीसाठी कणकवलीतील उबाठाच्या नेत्यांमध्ये सोशल वॉर !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 16, 2024 14:18 PM
views 262  views

वैभववाडी : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना आता कणकवली विधानसभा मतदारसंघात देखील उमेद्‌वारी मिळविण्यासाठी उबाठामधील इच्छुकांमध्ये चांगलाच सुप्तसघंर्ष सुरू झाला आहे. कुणाला पसंती या सर्व्हेक्षणाच्या नावाखाली हा सुप्त सघंर्ष उघड झाल्याचे बोलले जात आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजु लागले आहे. सर्वच राजकीय पक्ष विधानसभेचे ठोकताळे बांधु लागले आहेत. हे पडघम सुरू असताना कणकवली विधानसभा मतदारसंघात उमेद्‌वारी मिळविण्यासाठी उबाठा सेनेमध्ये असलेला सुप्तसंघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. 




एका सोशल साईटच्या माध्यमातुन कणकवली विधानसभा मतदारसंघात उबाठा सेनेकडुन कुणाला पसंती असा प्रश्न विचारून सर्व्हेक्षण करण्यात आले.यामध्ये सतिश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे आणि सुशांत नाईक आणि यापैकी कुणीही नाही असे पाच पर्याय देण्यात आले होते.सुरूवातीला युवा नेते सुशांत नाईक आघाडीवर होते.त्यानतंर आज सकाळी सतिश सावंत पहिल्या क्रमांकावर होते तर दुसऱ्या क्रमांकावर संदेश पारकर आणि सुशांत नाईक होते. तिसऱ्या क्रमांकावर अतुल रावराणे होते. त्यानंतर या नेत्यांच्या कार्यकर्त्यानी या साईटवर आपआपली मते देण्यास सुरूवात केल्यानतंर दुपारी ही साईटच बंद करण्यात आली.त्यामुळे हा सर्व्हे नेमका कुणी सुरू केला आणि त्याचा हेतु काय होता याची उलटसुलट चर्चा मतदारसंघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये चांगलीच रंगली आहे. या मतदारसंघात कुणालाही उमेद्वारी ठाकरे शिवसेनेकडुन अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळेच इच्छुकांपैकीच कुणीतरी हा सर्व्हे केला असावा अशी चर्चा आहे. 

मात्र ही साईट ठाकरे शिवसेनेतील कार्यकर्त्याच्या व्हॉटसॲपवर पोहोचल्यानतंर कार्यकर्त्यामध्येच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सुरू असुन विधानसभेसाठी लॉबींग सुरू झाल्याच देखील बोललं जात आहे.