राणेंचा दरारा उद्धव ठाकरे मोडू शकले नाही..!

माझी श्रीमंती चार पिढ्यांची | साईबाबाच तुम्हाला जागा दाखवतील : दीपक केसरकर
Edited by: विनायक गावस
Published on: February 05, 2024 06:34 AM
views 1200  views

सावंतवाडी : मी साईबाबांचा भक्त आहे हे मी लपवून ठेवल नाही. साईबाबांना साक्ष ठेवून सांगतो उद्धव ठाकरे असत्य बोलत आहेत. वस्तुस्थिती महाराष्ट्रापासून लपवत आहेत. ते भाजप सोबत पुन्हा जाणार होते. आता नवीन राज्य येणार हे शब्द त्यांचे होते‌. यात मला म़ंत्रीपदाची ऑफर त्यांनी दिली होती. पण, कोकणी माणूस स्वाभिमानी असल्यानं मी नकार दिला होता‌. पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्धव ठाकरेंची भेट होणार होती. त्याचा साक्षीदार मी आहे. तुम्ही कुणावर टीका करताय, नरेंद्र मोदींवर ?  खोटं बोलू नका, लोकांची दिशाभूल करू नका असा पलटवार करत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.

नारायण राणेंचा कोकणात एवढा दरारा होता की यांच्या गाडीत कुणी पेट्रोल भरत नव्हत. किती मत पडत होती शिवसेनेला ? सगळे शिवसैनिक राणेंसोबत गेले होते. कुणी उभं रहात नव्हत. राणेंचा दरारा उद्धव ठाकरे मोडून काढू शकले नाहीत असा टोला हाणत मी तुम्हाला पक्षात घ्या असं सांगायला आलो नव्हतो असा टोलाही लगावला.

आठवड्यातून दोनदा शिर्डीला जाणारे सत्तेच्या उबेसाठी श्रध्दा आणि सबुरी विसरतात नसानसात गद्दारी भरलेल्यांना जनताच धडा शिकवेल, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर केली. उद्भव ठाकरेंच्या टीकेला दीपक केसरकर यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. साई बाबांची शक्ती मोठी आहे. ती तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे केसरकरांनी म्हटले आहे.

दीपक केसरकर म्हणाले की, जेव्हा आम्ही एकत्र होतो आणि राज्यात कोणाचे सरकार स्थापन होणार तेव्हा मी एकटा आमदार होतो. ज्याला शिर्डीला जाण्याची परवानगी मिळाली. शिर्डीची शाल उद्धव ठाकरे यांना पांघरली म्हणून ते मुख्यमंत्री झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्भव ठाकरे यांची गाठ मी करून दिली. तिथे दिलेला शब्द तोडला नसता तर आज ही परिस्थिती आली नसती, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. शेवटी जनतेला वस्तुस्थिती सांगा. सिंधुदुर्ग या ठिकाणी तुम्हाला राहायला जागा दिली नव्हती. गाड्यांमध्ये पेट्रोल दिलं नव्हतं. तेव्हा मी संघर्ष केला आणि शिवसेना तिथे आली. साईबाबांचे नाव घेऊन मला चॅलेंज करू नका, साई बाबांची शक्ती मोठी आहे. ती तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी म्हटले. तर आमची चार पिढ्यांची श्रीमंती आहे. त्याबद्दल बोलताना विचार करून बोला, मागे देखील तुम्हाला संपत्तीबद्दल जाहीर बोललो होतो असं दीपक केसरकर म्हणाले.