मांडकीत ‘चोरगे चॅरिटेबल हॉस्पिटल’चं उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

Edited by: मनोज पवार
Published on: May 12, 2025 19:17 PM
views 79  views

चिपळूण : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे कृषी शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण यांच्या विद्यमाने उभारण्यात आलेल्या चोरगे चॅरिटेबल हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन आज मांडकी येथे उत्साहात पार पडले. या सोहळ्याचे प्रमुख उद्घाटक म्हणून उद्योग व मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र राज्य व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत आमदार शेखर निकम आणि श्री. बाबाजीराव जाधव उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, “ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी हे हॉस्पिटल एक महत्वपूर्ण टप्पा आहे. डॉ. तानाजीराव चोरगे यांचे दूरदृष्टीपूर्ण कार्य भावी पिढ्यांसाठी मोलाचे ठरेल.” तसेच त्यांनी जिल्ह्यातील अशा संस्थांना शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले.

आमदार शेखर निकम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “या हॉस्पिटलसोबत भविष्यात उभारण्यात येणारे मेडिकल कॉलेज ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नवी संधी निर्माण करेल, तसेच स्थानिकांना रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या करेल.” या उद्घाटनानंतर एक सुसज्ज  प्राथमिक रुग्णालय कार्यान्वित झाले असून, अत्यावश्यक सेवा, तपासणी केंद्र, लघु शस्त्रक्रिया विभाग, औषध वितरण कक्ष इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. चोरगे चॅरिटेबल हॉस्पिटल हे केवळ वैद्यकीय सेवा देणारे केंद्र न राहता, भविष्यात आरोग्य जनजागृती, वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आरोग्य शिबिरांचे केंद्र बनवण्याची संस्था घेत असलेली दिशा निश्चितच कौतुकास्पद आहे.

या प्रसंगी डॉ. अनिरुद्ध आठले जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. ज्योती यादव तालुका आरोग्य अधिकारी, उद्योजक श्री. सचिन पाकळे, तसेच डॉ. कृष्णकांत पाटील, डॉ. यतीन जाधव हे मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक डॉ. तानाजीराव चोरगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, संचालिका सौ. अंजलीताई चोरगे, संचालक मा. सुरेश खापले, वैद्यकीय अधिकारी डॉ. निमिश कदम, तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्याने मांडकी व परिसरात वैद्यकीय क्षेत्रात एक नवे पर्व सुरू झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.