वैभववाडी : मालवण राजकोट येथे बुधवारी झालेला प्रकार हा उबाठाने नियोजनबध्द पध्दतीने घडवुन आणलेला तो राडा होता. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने त्यांनी हा निंदनीय प्रकार केला असा आरोप भाजपाच्या महिला तालुकाध्यक्ष अध्यक्षा प्राची तावडे यांनी केला आहे.
मालवण मधील बुधवारी भाजपा ठाकरे गटात झालेल्या राड्यानंतर सौ. तावडे यांनी आमदार वैभव नाईक व उबाठा सेनेवर प्रसिद्धी पत्रकाद्वारे सडकून टीका केली आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, जिल्हयात उबाठाच्या नेत्यांना पराभवाची चाहुल लागली आहे.त्यामुळे जिल्हयात आता नियोजनबध्द राडा घडवुन आणण्याचे कटकारस्थान त्यांच्याकडुन सुरू आहे.जिल्हयात महायुतीच्या माध्यमातुन झपाट्याने विकास होत आहे.परंतु हा विकास उबाठा सेनेला बघवत नाही.लोकसभेत त्यांना जिल्हयात पराभव पत्कारावा लागला.आता विधानसभेत देखील त्यांना चारीमुंड्या चीत केले जाणार आहे.त्यांचा पराभव अटळ आहे.त्यांच्या पायाखालची वाळु सरकली आहे.त्यामुळे आमचे नेते खासदार नारायण राणे,माजी खासदार निलेश राणे,आमदार नितेश राणे यांच्यावर टिका करण्याचे काम ते करीत आहे.मालवणमध्ये झालेल्या राड्याला उबाठा सेनेचे कार्यकर्तेच जबाबदार आहेत.त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्याना हुसकावण्याचा प्रयत्न केला.घोषणाबाजी करून डिवचण्याचा प्रयत्न केला.हा नियोजनबध्द डाव होता.त्यांच्यामुळेच राडा झाला अशी टिका सौ.तावडे यांनी केली आहे.महाविकास आघाडीच्या नेत्यांकडुन राज्यभर माथे भडकविणारे राजकारण सुरू आहे.ते लोण आता मालवणपर्यत येवुन पोहोचले आहे.परंतु सिंधुदुर्गातील जनता त्यांना थारा देणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे.महाराजांच्या पुतळ्याचा आधार घेवुन गलिच्छ राजकारण त्यांच्याकडुन सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. तसेच ज्या राजांच्या नावांवर उबाठाने आपला पक्ष चालवला त्यांनी आतापर्यंत राजांचा एक पुतळा देखील बांधला नाही.त्याचबरोबर जो राजकोट येथे पुतळा उभारला होता त्याठिकाणी कधी गेले नाहीत.यावरुन त्यांच महाराजांवरील प्रेम किती आहे ते जनतेसमोर आले आहे. आता केवळ राजकारण करण्यासाठी हे प्रकार त्यांनी सुरू केले आहेत असा आरोप सौ.तावडे यांनी केला आहे.