LIVE UPDATES

दुचाकी घसरून युवक जखमी

आरोग्य सभापती सुधीर अरिवडेकर यांची मदतीसाठी धाव
Edited by: विनायक गांवस
Published on: May 08, 2026 19:55 PM
views 102  views

सावंतवाडी: अवकाळी पावसाने सावंतवाडी शहरात दाणादाण उडवून दिली. यातच प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे रस्त्यांची कामं रखडलेली असताना चिखलाच साम्राज्य निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे रस्ते बुळबुळीत होऊन अपघातांना आमंत्रण मिळत आहे. राजवाडा येथे जांभळ पडून रस्ता बुळबुळीत झाल्याने घसरून पडल्याने लॉरेन डिसोजा गंभीर जखमी झाले. यावेळी आरोग्य सभापती सुधीर अरिवडेकर यांनी धाव घेत मदतीसाठी पुढाकार घेतला.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अवकाळी पावसामुळे होणाऱ्या दुर्घटने संदर्भात सूचना केली होती. काल सायंकाळी अशाच पावसात चार अपघात घडले. तर आजच्या सायंकाळच्या पावसात सहा वाजता राजवाडा येथे जांभळाच्या झाडाखाली पडलेल्या जांभळावर घसरून लॉरेन डिसोझा हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्या डोक्याला चार टाके पडले असून हात पाय खरचटून गेलेत. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे सभापती सुधीर आरिवडेकर व तेथील नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन त्यांना सहकार्य केले. ही गंभीर बाब लक्षात घेऊन नगरपरिषेने तत्काळ जांभळांच्या झाडाखालील पडलेली जांभळे पाणी मारून साफ करावी अशी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी विनंती केली आहे. दुसरीकडे, रस्त्यांची कामं अर्धवट असून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तर खोदलेल्या रस्त्याची माती खाली बसली असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. यावर तात्काळ नगरपरिषदेकडून दखल घेत कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.