दोघांची भांडणं, तिसऱ्यावर चाकूचा वार

Edited by: लवू परब
Published on: March 19, 2025 19:04 PM
views 816  views

दोडामार्ग : शिमगोत्सवानिमित्त सुरू असलेल्या रोंबाटाच्या धामधूमीत किरकोळ कारणावरून दोन युवकात झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या हेदूस येथील विजयानंद अर्जुन करमळकर ( वय -४२) याच्यावर भांडण करणाऱ्या एका युवकाने चाकूने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना कुंब्रल वरचिवाडी येथे मंगळवारी रात्रौ १.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी अनंत सत्यवान सावंत ( वय - ३२) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर जखमीवर गोवा येथे उपचार करून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचारा साठी पाठविण्यात आले आहे.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, सध्या तालुक्यात शिमगोत्सवाची धूम सुरू आहे. काही ठिकाणी पाच दिवसांच्या शिमगोत्सवाची सांगता झाली आहे. मात्र नऊ दिवशिय शिमगोत्सव असलेल्या गावात सध्या रोंबाटाचा कार्यक्रम जोरात सुरू आहे. असाच रोंबाटाचा कार्यक्रम कुंब्रल वरचिवाडी येथे मंगळवारी रात्रौ सुरू होता. या कार्यक्रमात हेदूस येथील विजयानंद अर्जुन करमळकर हा युवक आपल्या मित्रांसमवेत मामाच्या गावच्या रोंबाटासाठी गेला होता. यावेळी त्याच्या समवेत असलेल्या मयूर नामक युवकाचा अनंत सावंत याला नाचताना हात लागला आणि या क्षुल्लक कारणामुळे त्या दोघात वाद झाला. या वादात अनंत याने मयूर ला मारहाण करून त्याचा शर्ट फाडला. हा वाद सोडविण्यासाठी विजयानंद गेला असता त्याच्यावर अनंत याने चाकूने हल्ला केला. त्यात विजयानंद याच्या ओटीपोटाखाली वार लागला आणि तो जखमी झाला. त्याला लागलीच नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले असता बांबोळी गोवा येथे उपचार करून त्याला पुन्हा दोडामार्ग रुग्णालयात दाखल करण्यात आले.सध्या तेथे उपचार सुरू आहेत. तर संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी अनंत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.