दोन एल.ई.डी. नौकां मालवण समुद्रात पकडल्या

सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई सुरूच
Edited by:
Published on: April 17, 2025 15:17 PM
views 374  views

मालवण : महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर अंदाजे ८ ते ९ सागरी मैल समुद्रात अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट व्दारे मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी येथील दोन एल.ई.डी. नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने करवाई केली आहे. 

या नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आल्या आहेत. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करून सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधदुर्ग कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. दोन्ही नौकांवर नौका तांडेलसह एकूण ६५ खलाशी आहेत. तर अंदाजे ७ लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे. तसेच सदर नौकांना ५ ते ६ लक्ष दंड होण्याची शक्यता आहे.

16 एप्रिल रात्री मालवण समोर मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी रविंद्र ग. मालवणकर, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, दांडी मालवण हे नियमित गस्त घालत होते. यावेळी रत्नागिरी येथील परवाना असलेल्या नौका हाजि जावेद नों. क्र.- IND-MH-४-MM-५८४३ व YM-मातिन-H-इस्माईल नों. क्र.- IND-MH-४-MM-५४०९ द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर अंदाजे ८ ते ९ सागरी मैल येथे अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट व्दारे मासेमारी करत असताना पकडले. 

अंमलबजावणी अधिकारी रविंद्र ग. मालवणकर, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, दांडी मालवण यांनी मालवण पोलिस ठाणे येथील पोलिस कर्मचारी  हरमलकर तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक मालवण व देवगड यांचे सहकार्याने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली आहे. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर या नौकेबाबत सुनावणी मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांचे कोर्टात ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती मत्स्य विभागाच्या वाटीने देण्यात आली.