
वेंगुर्ला : शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात आणि रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाच दिवशी करण्यात आलेल्या रक्त तपासणीच्या अहवालांमध्ये लक्षणीय तफावत आढळून आल्याने रुग्ण व नातेवाईकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
एका रिपोर्टमध्ये रुग्णाचे हिमोग्लोबिन (Hb) सुमारे 12.7 ग्रॅम, पांढऱ्या रक्तपेशी (WBC) 15,940 आणि प्लेटलेट्स 2.55 लाख असल्याचे नमूद आहे. तर दुसऱ्या कागदपत्रात Hb 8.1 ग्रॅम, WBC 9,000 आणि प्लेटलेट्स सुमारे 1.94 लाख असल्याचे दिसून येते. एकाच दिवशीच्या तपासणीत हिमोग्लोबिनच्या नोंदीत 12.7 वरून 8.1 ग्रॅमपर्यंतची तफावत दिसत असल्याने नेमका अहवाल कोणता योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच WBC व प्लेटलेट्सच्या नोंदीतही फरक आढळून येत आहे.
या प्रकारामुळे रुग्णाला योग्य उपचार देताना डॉक्टरांसमोरही अडचण निर्माण होऊ शकते. एकाच दिवशी आलेल्या दोन वेगवेगळ्या अहवालामध्ये एवढी तफावत कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. तपासणी प्रक्रियेत काही त्रुटी झाल्या कि रिपोर्ट बदलले? अशा प्रश्नांनी रुग्ण संभ्रमात पडला आहे.










