शिकारीच अडकले वनविभागाच्या जाळ्यात

Edited by: लवू परब
Published on: February 13, 2025 18:28 PM
views 405  views

दोडामार्ग : मांगेली कुसगेवाडी ते देऊळवाडी तिठा भागात शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या रोनी रोजी फर्नांडिस, वय ४७  थोरले भरड साटेली भेडशी, व गफूर मुसा शेख (३३ ) आवाडे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील विनापरवाना बंदूक हस्तगत करून त्यांच्या विरुद्ध अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला .

याबाबत अधिक माहिती अशीकी मांगेली कुसगेवाडी ते देऊळवाडी तिटा परिसरात रात्री १.००वाजता शिकारीच्या उद्देशाने विनापरवाना बंदूक घेऊन काहीजण फिरत असल्याची गुप्त माहिती दोडामार्ग वनविभागाला मिळाली होती. यावेळी उपवनसंरक्षक सावंतवाडी व एस नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक वनविभाग सावंतवाडी वैभव बोराटे, यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी दोडामार्ग व्हि.एस. मंडल आपली टीम घेऊन मांगेली येथे जाण्यास निघाले. यावेळी मांगेली कुसगेवाडी ते देऊळवाडी तिठा परिसरात दोन युवक हातात बंदूक घेऊन शिकार करण्याच्या उद्देशाने फिरताना आढळले.

यावेळी त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे बंदूक, सुरे, बॅटरीक, काडतुसे असा मुद्देमाल आढळून आला. त्यावेळी  वनपाल कोनाळ किशोर जंगले, वनसंरक्षक कोनाळ सुशांत कांबळे, वनसंरक्षक हेवाळे अजित कोळेकर व इतर कर्मचारी यांनी आरोपी रॉनी फर्नांडिस, व गफूर शेख यांना ताब्यात घेत कारवाई केली.