सावंतवाडीत रंगणार तुतारी कविसंमेलन!

राजभाषा दिनानिमित्त 'कोमसाप'चे आयोजन
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 24, 2023 19:19 PM
views 331  views

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीतर्फे जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलन मराठी भाषा दिनी दिनांक २७ फेब्रुवारीला सावंतवाडी येथील मोती तलावाच्या काठी, कवी केशवसुत कट्टा तुतारीजवळ सायंकाळी ६ ते ९ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

 कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन. या दिवशी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. यंदा मराठी भाषा दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार असून सायंकाळी ४.३० ते ५.३०  या वेळेत केशवसुत कट्टा ते गांधी चौक बाजारपेठ अशी मराठी भाषा जनजागृती अभियान रॅलीद्वारे मिरवणूक काढून 'मराठी भाषेचे संवर्धन व जतन' असा नारा दिला जाणार आहे. सावंतवाडी शहराची ख्याती सांस्कृतिक शहर व सांस्कृतिक वारसा जपणारी अशी आहे. त्याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात कवी केशवसुत कट्टा येथे तुतारीजवळ प्रथमच मोती तलावाच्या काठी मराठी भाषा दिनच्या निमित्ताने मोती तलावाची सायंकाळ 'तुतारी कवी संमेलनाने' मराठी भाषा दिन साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 या जिल्हास्तरीय कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी, साहित्यिक अनंत वैद्य हे भूषवणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, स्वागताध्यक्ष सुभाष गोवेकर, कवी विठ्ठल कदम, कवयित्री उषा परब, कोमसाप जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे, ज्येष्ठ साहित्यिक इतिहासकार डॉ. जी. ए. बुवा आदि उपस्थित राहणार आहेत.

 जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलन गेली कित्येक वर्षांपासून आयोजित करण्यात येते. यंदाचे यजमानपद सावंतवाडी शाखेकडे असून सावंतवाडी शाखेने हे कवी संमेलन हटके करण्याचे ठरवले आहे. कवी केशवसुत कट्ट्यावरच तुतारी जवळ सायंकाळच्या पहरी जिल्ह्यातील कवींच्या कविता रंगणार आहेत. प्रथमच तुतारी जवळच तुतारी कवी संमेलन होणार आहे. सावंतवाडी, दोडामार्ग,  कुडाळ, कणकवली, मालवण, देवगड, वेंगुर्ले आदी भागातून कवी व कवियत्री या संमेलनात सहभागी होणार आहेत. या जिल्हास्तरीय कवी संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषा दिन असल्याने मराठी भाषेचे संवर्धन व जतन व्हावे, मराठी शाळा टिकाव्यात यासाठी कवी संमेलनाच्या अगोदर  सावंतवाडी बाजारपेठेत रामेश्वर प्लाझा मोती तलावाच्या काठाकडून विद्यार्थी व साहित्यिक कवींची मराठी भाषा जतन संवर्धनसाठी भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीचा शुभारंभ कार्यक्रमाला मुख्याधिकारी जयंत जावडेकर, तहसीलदार अरुण उंडे, पोलीस निरीक्षक फुलचंद्र मेंगडे आदी उपस्थित राहणार आहेत.  जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन, व इतर सावंतवाडी शहरातील शाळेतील विद्यार्थी या रॅलीत सहभागी होणार आहेत. या रॅलीत मराठी भाषा जनजागृतीसाठी मराठी भाषा संवर्धन जतन करणाऱ्या सर्व भाषा प्रेमींनी सहभागी व्हावे, तसेच ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपली नावे विनायक गावस यांच्याकडे तर कवी संमेलनात ज्यांना कविता सादर करावयाच्या आहेत त्यांनी आपली नावे कवी विठ्ठल कदम व दीपक पटेकर (9421237568) यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन कोमसाप सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, सचिव प्रतिभा चव्हाण, खजिनदार डॉ. दीपक तुपकर आदींनी केले आहे.