
दोडामार्ग : अवघ्या दोन तीन दिवसांपूर्वी आढळलेल्या टस्कर हत्तीकडून हेवाळे येथे मोठं नुकसान सुरू झालंय. या टस्कराचा लोकवस्तीनजिक वावर वाढू लागल्याने हेवाळेतील ग्रामस्थ शेतकरी अत्यंत भयभीत झाले आहेत. शिवाय हत्तीचा वावर आता घराशेजारी होऊ लागलाय. हत्तीच्या मोठ्याने चित्काराने भीतीच वातावरण आहे.
दोडामार्ग - विजघर मार्गावरील हेवाळे या ठिकाणच्या रस्त्यालगत असलेल्या प्रसिद्ध राममंदिरनजिक दोन मोठे सुळे असलेला जंगली हत्ती ( टस्कर ) आढळून आला होता. या हत्तीचा हेवाळे गावात मुक्त संचार सुरू आहे. थेट लोकवस्तीनजिक हा हत्ती येऊन धुडगूस घालत आहे. गावातील दत्ताराम देसाई यांच्या घरालगतच्या भिडले माडाचे नुकसान या हत्तीने केले. त्याचबरोबर एका कारलाही हत्तीचा तडाखा बसला. यामुळे हेवाळे परिसरातील ग्रामस्थ शेतकरी अत्यंत भयभीत झाले आहेत. या हत्तीला घालविण्यासाठी वनविभागाकडून केले जाणारे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. या उपायांचा हत्तीवर कोणताही फरक पडलेला नाही. उलट हत्तिकडून नुकसान सुरूच आहे.