दोडामार्ग : हेवाळे गावात टस्कर हत्तीने मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला असून शुक्रवारी रात्री लोकवस्तीत घुसून सुर्यकांत देसाई यांच्या फळ बागायतीत घुसला. सुपारी, माड उध्वस्त केले. मोठा भेडला माड कोसळून घातला. तो गोठ्यावर पडल्याने गाय व बैल जखमी झाले. शिवाय हत्तीने मोठ्याने चित्कार सोडल्याने जनावरांसह घरातील मंडळी घाबरली. सुर्यकांत देसाई व तानाजी श्रीपत देसाई यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शुक्रवारी रात्री २ वा.च्या सुमारास टस्कर हेवाळे गावात शिरला. तेथील लोकवस्तीत वावरत असताना सुर्यकांत देसाई यांच्या फळ बागायतीत घुसला. त्यांची सुपारीची झाडे व लागते माड उध्वस्त केले. तसेच भला मोठा भेडला माड कोसळून घातला. हा माड लगतच्या श्रीपत देसाई यांच्या पाळीव जनावरांच्या गोठ्यावर पडला. गोठ्यात गाय, बैल, म्हशी होते. त्यांच्या अंगावर पत्रे, वासे, लाकडे पडली. यावेळी जनावरांनी भीतीने हंबरण्यास सुरुवात केली. ते ऐकून टस्कराने मोठा चित्कार सोडला. त्यामुळे जनावरे बिथरली.
आवाजाच्या गोंगाटामुळे घरातील मंडळी जागी झाली. बाहेर पडून टस्कराला हुसकावून लावले. गोठा उध्वस्त झाल्याने जनावरांचा बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला. अखेर त्यांच्या गळ्यात बांधलेली दावी कापून सुटका करावी लागली. यात गाय व बैल जखमी झाले आहेत. सुटका करण्यासाठी सोडलेला बैल घाबरून पळाला तो अजून सापडला नसल्याचे शेतकरी श्रीपत देसाई यांचे म्हणणे आहे. टस्कराने बागायती व गोठ्याचे मिळून लाखोंचे नुकसान केले आहे. वनविभागाने टस्कराचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.