समाज मंदिर परिसरात गढूळ - जंतूयुक्त पाणीपुरवठा

नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्याचा आरोप
Edited by: विनायक गांवस
Published on: April 22, 2026 14:26 PM
views 73  views

नगरसेविका अ‍ॅड. निता सावंत-कविटकरांची नाराजी 

सावंतवाडी : समाज मंदिर परिसरात चार दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पाणी येत नसल्याने दैनंदिन कामांवर परिणाम होत असताना, मिळणारे पाणीही गढूळ व जंतूयुक्त आहे. गॅस पाईपलाईनच काम करताना पाण्याची लाईन फुटल्याने हे प्रकार वाढले आहेत. याकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका अ‍ॅड. निता सावंत-कविटकर यांनी करत कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.


त्या म्हणाल्या, समाज मंदिराजवळ सुरू असलेल्या गॅस लाईनच्या खोदकामादरम्यान मुख्य पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. तसेच पाण्याच्या टाकीजवळील पाईप लिकेज झाल्यामुळे संध्याकाळी सुमारे सात वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. परिणामी टाकी पूर्ण भरत नसून नागरिकांच्या घरांपर्यंत पाणी अत्यंत कमी दाबाने येत आहे. काही ठिकाणी अजिबातच पाणी येत नाही. याबाबत नगरपालिकेला वारंवार कळवूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप ॲड. सावंत कविटकर यांनी केला आहे. तसेच संबंधित कर्मचारी दुपारपर्यंतही कामावर हजर राहत नसल्यामुळे दुरुस्तीचे काम रखडले आहे, अशीही नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. तातडीने पाईपलाईन दुरुस्त करून नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच येथील शासकीय विश्रामगृहा समोरील फुटलेल्या पाईप लाईनमुळे वाया जाणाऱ्या पाण्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.