
सावंतवाडी : शहरातील चिंवार टेकडी ते समाजमंदिर परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली असून बाधित क्षेत्रातील पाणीपुरवठा आता सुरळीत करण्यात आला आहे. गॅस पाईपलाईनच्या कामामुळे ही जलवाहिनी फुटल्याने गेल्या काही दिवसांपासून शहराच्या काही भागांत गढूळ आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. नॅशनल हायवे लगत असलेल्या चिंवार टेकडी परिसरातून समाजमंदिर भागाला पाणीपुरवठा करणारी जुनी जलवाहिनी आहे. या भागात महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड कंपनीकडून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम करत असताना हायवेच्या बाजूने 'आडवे बोअर' मारताना पालिकेच्या मुख्य जलवाहिनीची मोठी मोडतोड झाली होती. महामार्गालगत असल्याने तांत्रिक अडचणींमुळे या कामाला विलंब होण्याची शक्यता होती. मात्र, प्रशासनाने तातडीने पावले उचलली. पाणीपुरवठा खंडित झाल्याची तक्रार येताच सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाने गॅस कंपनीच्या सहकार्याने दुरुस्तीचे काम हाती घेतले. २३ एप्रिल रोजी ही दुरुस्ती पूर्ण करण्यात आली.
जलवाहिनी फुटल्यामुळे समाजमंदिर परिसर, गरड, खासकीलवाडा, जुस्तीन नगर, शिल्पग्राम आणि तिलारी रोड या भागांत पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. पाईपलाईनच्या मोडतोडीमुळे काही भागात गढूळ पाणी येत होते. ही समस्या सोडवण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित भागातील 'वॉश आऊट' सोडून जलवाहिनीतील घाण उपसून काढली आणि नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल याची खात्री दिली आहे. गॅस कंपनीच्या कामामुळे जलवाहिनीचे नुकसान झाले होते. मात्र, पाणीपुरवठा विभाग आणि MNGL कंपनीच्या माध्यमातून तीन ते चार दिवसांत दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. सध्या संबंधित सर्व भागांत शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती नगरपरिषद प्रशासनाने दिली.










