
वेंगुर्ले : वेंगुर्ला पंचायत समितीची मासिक सभेत आज विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना उपसभापती सचिन देसाई यांनी खडे बोल सुनावले. मठ संत लालाजी मंदिर ते कुडाळ तिठा येथे भूमिगत वीज वाहिन्यांचे काम सुरू आहे. मात्र गेले २ ते ३ महिने या ठिकाणी चर खोदून ठेवल्याने अनेक अपघात होत आहेत. काल गुरुवारी २३ एप्रिल रोजी मठ मठकर वाडी येथे झालेल्या अपघातात देवगड येथील २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.
यामुळे आज पंचायत समिती मासिक सभेत विद्युत वितरणला जबाबदार धरत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ठेकेदार तुमचा पाहुणा आहे का ? ठेकेदार तुमचं ऐकत नाही का ? निष्काळजीपणे काम होत असल्याने त्यावर तात्काळ कारवाई करा. आम्हाला लोकांचा जीव महत्वाचा आहे. ठेकेदाराचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. १ महिन्यापूर्वी मागील सभेत सूचना देऊनही कोणतीच अमलबजावणी झाली नाही. खणून ठेवलेल्या चरांच्या ठिकणी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याच उपाययोजना नाहीत. अशा प्रकारे उपसभापती सचिन देसाई यांनी विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत सदर काम २ दिवसात पूर्ण करा अशी सक्त ताकीद दिली.
यावेळी बोलताना सदस्य नितीन मांजरेकर यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले, मठ कुडाळ रस्त्यावर ठिकठिकाणी २०० मी पेक्षा जास्त चर खणून ठेवलेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही ठिकाणचे चर बुजवले. मात्र विद्युत वितरण यावर लक्ष देत नाही. सभेत जे अधिकारी बोलतात त्यांना त्या भागाचे कोणतेही ज्ञान नाही. ते शहरासाठी काम करतात. त्या भागात काम करणारे अभियंता सभेला उपस्थित राहत नाहीत. असे सांगत विद्युत वितरण ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप मांजरेकर यांनी केला.










