जिल्ह्यात गवळी समाज भवन उभारण्यासाठी ट्रस्ट प्रयत्नशिल : अजय बिरवटकर

Edited by: विनायक गांवस
Published on: May 13, 2024 10:37 AM
views 254  views

सावंतवाडी : महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे काम कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील गवळी समाज बांधवांच्या सहकार्याने सिंधुदूर्ग जिल्ह्यात गवळी समाज भवन उभारण्यासाठी ट्रस्ट प्रयत्नशिल आहे. जिल्हयातील गवळी समाजाने संघटीत राहून गवळी समाज भवन साकारण्यासह समाजाचा विकास साधावा. त्यासाठी ट्रस्टच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर यांनी दिली. तसेच समाजातील जुन्या कालबाह्य आणि महिलांबाबतीत वेदनादायक रूढी परंपरा बंद करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही केले.

महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या १६ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त माडखोल येथील रुद्र सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा गवळी समाज मेळाव्यात अजय बिरवटकर बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे सरचिटणीस उदय पाटील, सहचिटणीस प्रकाश गवळी, विश्वस्त अशोक दाते, चंद्रकांत चिले, बापूसाहेब चिले, महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे कार्याध्यक्ष दशरथ शृंगारे, उपकार्याध्यक्ष बयाजी बुराण, सचिव नामदेव गो. गवळी, खजिनदार सिताराम केळुसकर,  सहसचिव रामचंद्र भालेकर, सदस्य बाबुराव भालेकर, रामदास बुराण, विश्राम केळूसकर, कृष्णा पंदारे, प्रशांत हनपाडे, सुरेश वरेकर, प्रशांत बुराण, सिताराम गवळी, चंद्रसेन लाड, चंद्रकांत चिले, निकिता गवळी, अमिषा गवळी, सल्लागार शंकर काटाळे आदी उपस्थित होते. यावेळी उदय पाटील आणि अशोक दाते यांनी गवळी समाज मेळाव्यातील महिलांच्या उपस्थितीबाबत समाधान व्यक्त केले तसेच शिखर संस्था अध्यक्ष अजय बिरवटकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गवळी समाज भवन बांधण्यासाठी  सुरुवातीला जागा खरेदीसाठी स्वतः ₹. १ लाख देण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही  सर्व  समाजबांधव आपल्या न्याय व हक्कासाठी संघटित होत असताना गवळी समाजाने आपली एकजूट दाखवून आपली ताकद दाखवून द्यावी असे आवाहन केले.

 यावेळी विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी बजावलेल्यांमध्ये गवळी समाजातील माडखोल - धवडकी येथील डॉ. सरोजा बाबली चिले हिने गोवा विद्यापीठातून बी.ए.एम.एस ही पदवी संपादन केल्याबद्दल, सावंतवाडी कारीवडे येथील कवी प्रोफेसर डॉ नामदेव गवळी यांना साहित्य अकादमीच्या दिल्ली महोत्सवात मालवणी बोलीतील काव्य वाचनासाठी निमंत्रित आणि सहभागाच्या बहुमानाबद्दल, इतिहास अभ्यासक सुनिल बुराण यांनी इंडीयन हिस्टोरी या विषयामध्ये गोवा विद्यापीठातून पी.एच.डी संपादन केल्याबद्दल, आंबेगाव येथील प्रकाश शंभा केळुसकर यांनी राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविल्याबद्दल  तसेच  गुणवंत व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी यांचा व्यासपीठावरील  मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सौ. शीतल पाटील (कोल्हापूर) यांनी स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. यानिमित्त खास महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच यावेळी रांगोळी व वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आल्या. त्यानंतर गवळी समाजातील वधुवर परिचय कार्यक्रम झाला. या गवळी समाज मेळाव्याला सिंधुदूर्ग जिल्हयातील गवळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे कार्याध्यक्ष दशरथ शृंगारे यांनी सुत्रसंचालन सदस्य रामदास बुराण यांनी तर आभार उपकार्याध्यक्ष बयाजी बुराण यांनी मानले.