हत्ती मुक्त दोडामार्गसाठी चाकरमान्यांना विश्वासात घ्या : बुधाजी मोरगांवकर

Edited by:
Published on: March 11, 2025 13:32 PM
views 133  views

दोडामार्ग :  हत्ती मुक्त दोडामार्ग करण्यासाठी सध्या गाव पातळीवर आंदोलने सुरू आहेत. मात्र यावर योग्य कार्यवाई करण्यात स्थानिक प्रशासन कमी पडत असल्याचे दिसत आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबईकर चाकरमनी व गाववाले यांनी एकत्रित लढा देणे गरजेचे असल्याचे मत दोडामार्ग तालुका विकास मंडळ मुंबईच्या वतीने बुधाजी मोरगांवकर यांनी व्यक्त केले. २००४  मध्ये सर्वप्रथम दोडामार्ग मध्ये झालेल्या हत्ती पकड मोहिमेची आठवण त्यांनी या निमित्ताने करून दिलीय.

 ते म्हणाले की, २००४ च्या दरम्यान दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील हेवाळे, घाटिवडे, बांबर्डे, मूळस, सोनवाल, पालये, घोटगेवाडी, मोर्ले, केर, बाबरवाडी, बोरये व इतर परिसरात हत्तीचा  हैदोस होता. येथील शेतकरी बांधव हत्ती उपद्रवाने त्रस्त होता. त्यावेळीही गाव पातळीवर खूप आंदोलने होत होती, मात्र स्थानिक प्रशासनाकडून काहीच ठोस कार्यवाई होत नसल्याचे निदर्शनास येत होते. नंतर मुंबईस्थित चाकरमानी तालुका विकास मंडळाच्या माध्यमाने मंत्रालयातून सूत्रे हलवण्यास सूरवात झालीत.  हा विषय शासनाने गांभीर्याने घेतला व नंतर " हत्तीना आल्या पाऊली परत जा" (एलिफंट गो बॅक टू होम) या नावाने मोहीम राबवण्यात आली, असे मोरगांवकर यांनी नमूद केले. मोहिमेसाठी मुंबई, नागपूर येथून आलेल्या अधिकाऱ्याची ऊठबस दोडामार्गचे लोकनेते सुरेशभाई दळवी यांनी केली. त्यावेळी टीम वर्क होते असे त्यानी नमूद केले.   हत्ती सारखा मोठा, गहन व जुना विषय एकत्रित हाताळण्याची गरज आहे.

मात्र, गावपातळीवरील मंडळी, मुंबईकर चाकरमान्यांना विश्वासात घेत नसल्याची खंत मोरगावकर यांनी व्यक्त केली. मोरगावकर यांनी पूर्वीची अजून एक घटना सांगितली ती अशी, हत्ती मोहीम अजून प्रखर व्हावी व हत्ती ग्रस्त शेतकऱ्यांना विनाविलंब मोबदला मिळावा या मागणीसाठी मंडळाच्या वतीने सन २००४ मध्ये आझाद मैदान मुंबई येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. या आंदोलनात जवळ जवळ २५० चाकरमानी सहभागी झाले होते.  या आंदोलनात सुरेश दळवीही सहभागी झाले होते असेही त्यांनी सांगितले.  हत्ती मुक्त दोडामार्ग व्हावा यासाठी दोडामार्ग तालुका विकास मंडळ प्रयत्नशील असून या साठी वनमंत्री, पालकमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आली आहेत. व बजेट अधिवेशन संपताच एक शिष्टमंडळ संबंधितांना भेटणार असल्याचेही मोरगावकर यांनी सांगितले. सध्या गावच्या लोकांची आंदोलने सुरू आहेत, त्याला आपल्या शुभेच्छा आहेत असेही ते म्हणाले. मात्र या विषयावर आवश्यक असल्यास मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट अनिल गवस, सचिव अशोक दळवी, कार्यकारी अध्यक्ष वासुदेव वर्णेकर यांना संपर्क साधावा असे आवाहनही त्यानी केले आहे.