
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेल्या तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार माजी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडून स्वीकारला. जिल्हाधिकारी यांच्या दालनात श्रीमती धोडमिसे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, आरती देसाई, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, तहसिलदार विरसिंग वसावे, चैताली सावंत तसेच महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी औपचारिक ओळख करुन घेत संवाद साधला.
थोडक्यात परिचय
शासकीय सेवेतला प्रवास
IAS अधिकारी म्हणून त्यांनी विविध महत्वाच्या पदांवर काम केले आहे.
• सहायक आयुक्त, GST पुणे- ५ वर्षे महसूल व करसंकलन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी
• IAS प्रशिक्षणार्थी, LBSNAA (2019 ते 2021)- प्रशासनातील मूलभूत प्रशिक्षण
• सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, ITDP, धुळे (९ जुलै २०२१ ते २१ जुलै २०२३) आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत कार्यरत राहून अनेक योजनांची यशस्वी अंमलबजावणी
• मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली (२२ जुलै २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२५)- प्रशासकीय शिस्तीसाठी त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. २५ जून २०२५ रोजी जागतिक योग दिनानिमित्त सांगली जिल्ह्यातून पाच लाखांहून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत एकाच वेळी एकाच तालावर समान योग रचना सादर करण्यात आली. या उपक्रमाची नोंद 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स', 'आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' आणि 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये झाली
- ई-ऑफिस प्रणालीमध्ये जिल्हा परिषद, सांगली राज्यत प्रथम आणली
- माझी वसुंधरा अभियानात सागली जिल्हा राज्यात प्रथम
- १५ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर वेगवान कामे
- 'माझ्या गावचा धडा' हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आपल्या गावाचा अभिमान जागृत करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला
- 'चला सावली पेरुया अभियान', प्लास्टिक निर्मूलन चळवळीचे आयोजन
- सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान
- आरोग्य सुविधा पोहचविण्यामध्ये राज्यात अग्रेसर
शैक्षणिक व व्यावसायिक पार्श्वभूमी
श्रीमती धोडमिसे यांनी पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (COEP) पुणे मधून Production Engineering मध्ये बी.टेक केलेले आहे.
खासगी क्षेत्रातील अनुभव
शासकीय सेवेत दाखल होण्यापूर्वी त्यांनी लार्सन अँड टुब्रो (L&T), अहमदनगर येथे ४ वर्षे काम करताना महत्वपूर्ण औद्योगिक अनुभव मिळालेला आहे.