तिलारी घाटात ट्रक अडकला ; 7 तास वाहतूक ठप्प

Edited by: संदीप देसाई
Published on: January 20, 2024 13:50 PM
views 226  views

दोडामार्ग : तिलारी घाटातील अपघातांचे शुक्ल काष्ट सुरूच असून काही वाहन चालकांचा आताताईपणा अन्य प्रवासी व वाहन चालकांना डोकेदुखी ठरत आहे.  घाटमाथ्यावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरणाऱ्या तिलारी रामघाट सर्वात नागमोडी वाहनांचा अवघड घाट म्हणून ओळखला जातो. मात्र याच घाटातून तब्बल 16 चाकी मालवाहतूक ट्रक एका चालकाने घाटातून उतरण्याचा घेतलेला धाडसी निर्णय त्याच्याच अंगाशी आला. घाटाच्या सुरवातीलाच वळणावर  हा ट्रक  संपूर्ण रस्त्याच्या मधोमध अडकल्याने या घाटातील वाहतूक तब्बल ७ तास ठप्प राहिली.

      त्यामुळे बेळगाव, कोल्हापूर तसेच पछिम महाराष्ट्र व हैद्राबाद मधून गोव्यात पर्यटनासाठी येणारे आणि  पुन्हा माघारी परतणारे  शेकडो पर्यटक घाटाच्या माथ्यावर व पायथ्याशी अडकून पडले.

या अवघड घाटातून वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता व अवजड वाहतूकही मोठ्या प्रमाणात वाढली गेल्याने या वाहतुकीबाबत चंदगड सार्वजनिक बांधकाम खात्याने वाहतुकीबाबत ठोस धोरण हाती घेणे आवश्यक आहे.  या घाटातून कोणत्या वाहनांना वाहतुकीस परवानगी दिली जावी याबाबतही निर्णय घेणे सर्वकश हीताचे ठरणारे आहे. अन्यथा हा जीवघेणा घाट कधी कोणाचा बळी घेईल ? आणि असे अनुचित प्रकार कित्येक वेळा घडतील ? याचे उत्तर कोणी देऊ शकत नाही.

        या घाटात माथ्यावरच शनिवारी पहाटेच्या सुमारास घाटातुन गोव्याच्या दिशेने जाणारा १६ चाकी ट्रक पहीला उतार काढुन दुसर्‍या उतारावर आला असता वाहन चालकाचा ताबा सुटून हा ट्रक रस्त्यामधेच अडकुन पडला. त्यामुळे संपुर्ण घाट वाहतुकीस बंद झाला.

       तब्बल सात तांसाच्या अथक प्रयत्नानंतर मोठ्या क्रेनच्या सह्यायाने तो भला मोठा ट्रक बाजूला करून वाहतूक पूर्वरत करण्यात आली. वाहन चालकांचा अती आत्मविश्वास त्यांच्या अंगाशी येऊन असे अनेक वेळा तिलारी घाटात घडत आहेत. मात्र यावर सार्वजनिक बांधकाम  विभागाकडुन ठोस उपाययोजना होण्यास दिरंगाई होत आहे.  

घाट बंद झाल्याने वाहतूक वळविली पर्यायी मार्गाने

दरम्यान घाट रस्ता वाहतुकीस बंद झाल्याचे समजताच दोडामार्ग पोलिसांनी विजघर येथील चेकपोस्टवर बँरिकेट लावुन तिलारी घाटातील वाहतुक आंबोली घाटातुन वळविली. तर चंडगड पोलिसांकडुन तिलारीनगर येथे बँरिकेट लावुन तेथूनही तिलारी घाटातून वाहतुक वळवीली.


एस टी सेवा मात्र राहिली ठप्प

दोडामार्ग गोवा ते बेळगाव कोल्हापूर तिलारी हा घाटरस्ता अत्यंत जवळचा मार्ग असल्याने याच मार्गावरून दिवसभरात बेळगाव कोल्हापूरला जोडणाऱ्या दहा ते बारा एसटी बसेस रोज अपडाऊन करतात. मात्र पहाटेपासून उशिरापर्यंत घाट रस्ता बंद राहिल्याने या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या एसटी बसेस घाटाच्या दोन्ही बाजूने अडकून पडल्या होत्या.