दिलीप गवस यांचं उपोषण

Edited by:
Published on: February 14, 2025 19:52 PM
views 96  views

दोडामार्ग : शिरंगे येथे धरणाच्या जलाशयाला लागून काही काळ्या दगडाच्या खाणी सुरू आहेत. अनेकांच्या जमिनीत दगड, माती टाकून नुकसान केले जात आहे. महसूल यंत्रणेने या खाणींवर करावाई करावी या मागणीसाठी दिलीप गवस यांनी गुरूवारपासून शिरंगे येथ सुरु केलेलं उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच होते.

उपोषण कर्ते यांच्या म्हणण्यानुसार शिरंगे गावात दिलीप गवस यांची वडिलोपार्जित जमीन आहे. या ठिकाणी काजू व इतर झाडे असून ती बुडीत क्षेञाच्या बाहेर आहेत. सन २०१४ मध्ये या जमिनीत त्यांनी नवीन काजू झाडांची लागवड केली. या जमिनीला लागून  मोठ्या प्रमाणात खडी उत्खनन केले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. 

या दगड, मातीमुळे आपली काजू झाडे मातीखाली गाडली गेली आहेत. त्यांनी जमिनीत चर खोदला होता, तो बुजवून खडी वाहतूक करण्यासाठी रस्ता केला आहे. याबाबत प्रजासत्ताक दिनी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिलीप गवस यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिला होता. मात्र पालकमंत्री यांनी याबाबत प्रशासनाला योग्य त्या चौकशीचे आदेश दिल्याने  दिलीप गवस यांनी त्यावेळचे उपोषण स्थगित केले होते. मात्र पुन्हा त्या दगड खाणींवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू ठेवल आहे.