
सावंतवाडी : वेत्ये गावातील विजेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी महावितरण कंपनीकडून होणारा विलंब आणि त्यामुळे गावातील ग्रामस्थांना होणारा त्रास लक्षात घेता सरपंच गुणाजी गावडे यांच्यासह गावातील लोकप्रतिनिधींनी वीज वितरणचे सावंतवाडी उपअभियंता शैलेश राक्षे यांना जाब विचारला. गावातील प्रश्न तात्काळ मार्गी लावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यावेळी उद्यापासून गावातील विद्युत कामे हाती घेण्यात येणार असल्याचे आश्वासन उप अभियंता श्री राक्षे यांनी दिले.
तालुक्यातील वेत्ये गावांमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच विजेच्या समस्या वारंवार भेडसावत आहेत. या संदर्भात सरपंच गुणाजी गावडे तसेच ग्रामस्थांकडून विविध वितरणच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना कल्पना देऊनही सदरच्या समस्या सोडवण्याबाबत दुर्लक्ष केला जात होता. एकूणच याचा फटका गावातील ग्रामस्थांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना सहन करावा लागत होता. महावितरणचा हलगर्जीपणा आणि कामचुकारपणा लक्षात घेता आज सरपंच श्री गावडे यांच्यासह गावातील लोकप्रतिनिधींनी व ग्रामस्थांनी उपअभियंता श्री राक्षे यांच्या कार्यालयात धडक देत त्यांना जाब विचारला. वारंवार कल्पना देऊनही गावातील विजेच्या समस्या सोडवण्याकडे टाळाटाळ का केली जाते ? असा प्रश्न सरपंच श्री गावडे यांनी केला. गावामध्ये विद्युत लाईनवर मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. त्यामुळे वारंवार लाईट जाण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच बऱ्याच ठिकाणी विद्युत पोल जीर्ण होऊन ते धोकादायक बनले आहेत. गावातून जाणारे अकरा केव्ही विद्युत लाईन सकस आहार मैदान परिसरामध्ये बऱ्याच प्रमाणात खाली आली आहे. त्या ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही लाईन तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी. गावामध्ये ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारची कल्पना न देता स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनालाही कुठलीही माहिती नाही. हा प्रकार चुकीचा असून ज्यांना स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहे त्यांना कुठल्याही प्रकारचे विद्युत बिलही देण्यात आलेले नाही. त्यामुळे भविष्यात वाढीव लाईट बिल आले तर आर्थिक अडचणीचा सामना त्यांना करावा लागणार आहे. यासंदर्भात आपण तोडगा काढावा. अन्यथा, बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढून टाकावे अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांच्या मागण्या व आक्रमकता लक्षात घेता उप अभियंता श्री राक्षे यांनी वेत्ये गावातील विद्येच्या समस्या सोडवण्यासाठी उद्यापासूनच आपण कर्मचाऱ्यांना सूचना देऊ सुरळीत विद्युत पुरवठा होण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र आंबेकर, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुदास गावकर, नरेंद्र मिठबावकर, जितेंद्र गावकर, पुंडलिक देऊलकर, अंतोन फर्नांडिस, शेखर खांबल, बाबू देऊलकर, सत्यवान गावडे, भूषण पाटकर, राम पेडणेकर, संदीप गावडे, अंकुश गावडे, अनंत गोठसकर आदी उपस्थित होते.