
वैभववाडी : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी तालुक्यात तहसील कार्यालयाच्यावतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. हातात तिरंगा घेत भारतमातेचा जयघोष करत विद्यार्थी, युवक, शिक्षक आणि शासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले.
रॅलीदरम्यान सहभागींच्या हातातील तिरंगा डौलाने फडकत होता. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या रॅलीत तहसीलदार सूर्यकांत पाटील, सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, स्नेहा माने, प.स.सदस्य देवानंद पालांडे, जिल्हा परिषद माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, कृषी अधिकारी निरंजन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक फकरुद्दीन आगा, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली काकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शहरात आज तिरंगा रॅली काढण्यात आली होती. तहसील कार्यालयापासून रॅलीला प्रारंभ झाला. शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत रॅली दत्त मंदिर येथे पोहोचली. त्यानंतर पुन्हा तहसील कार्यालयात रॅलीची सांगता झाली. अर्जुन रावराणे विद्यालय, माधवराव पवार विद्यालय, दत्त विद्यामंदिर येथील विद्यार्थी तसेच विविध शासकीय आस्थापनांतील अधिकारी, कर्मचारी रॅलीत सहभागी झाले होते. तिरंगा रॅलीमुळे शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.










