
दोडामार्ग : कुडासे भोम - धनगरवाडी येथे फुटलेल्या तिलारी प्रकल्पाच्या डावा कालव्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून तिलारीतुन गोवा राज्याचा पाणीपुरवठा शनिवार पासून पूर्वरत करण्यात आला आहे. एन पावसाळ्यात कालवा भगदाड पडून फुटल्याने हे काम लवकरात लवकर पूर्ण करून गोवा राज्याला पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्याचे मोठे आव्हान तिलारी प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर होते. मात्र तिलारी प्रकल्पाचे स्थानिक ठेकेदार व युवा उद्योजक दत्ताराम उर्फ बाबा टोपले यांनी हे चॅलेंज अगदी आठवड्यात पूर्ण करत कालवा बांधणी कामात आपणच अव्वल असल्याचा नवा ब्रँड निर्माण केला आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांनी सुद्धा बाबा टोपले यांच्या या कामगिरी बाबत विशेष समाधान व्यक्त केलं आहे.
तिलारीच्या गोव्याला जाणाऱ्या डाव्या कालव्याला गेल्या आठवड्यात भगदाड पडले. कालव्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे गोव्याला होणारा पाणी पुरवठाही बंद झाला. एका ठिकाणी गोव्याला पिण्याच्या पाण्याची नितांत आवश्यकता तर दुसऱ्या ठिकाणी पावसाचे दिवस. त्यामुळे फुटलेल्या कालव्याची दुरुस्ती होणे, तीही जलद गतीने तितकेच आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर तिलारी प्रकल्प अधिकारी हें काम करण्यासाठी अनुभवी व आवश्यक सर्व साधनसामग्री असलेला ठेकेदाराच्या शोधात होते. मात्र गेली अनेक वर्षे प्रकल्पाकडे कालवा बांधण्याचे काम करणारे ठेकेदार बाबा टोपले यांचे नाव समोर आले. त्यांनी याबाबत टोपले यांच्याशी चर्चा केली. मग काय हे चॅलेंज स्वीकारून दर्जात्मक काम करण्याचे शिवधनुष्य बाबा टोपले यांनी उचलेले. आणि प्रकल्प अधिकारी यांनी निर्धारित केलेल्या वेळेत रात्रं दिवस काम करून फुटलेला कालवा मातीकाम व काँक्रिट बांधकामासह पूर्ण केला. शुक्रवारी या बांधकाम ठिकाणी काळा वॉटरप्रूफ प्लास्टिक कागद टाकून या कालव्यातून गोव्याला पाणी पुरवठा पूर्वरत करण्यात आला. प्रकल्प अधिकारी यांच्या देखरेख व मार्गदर्शनाखाली टोपले यांनी सर्व ताकद पणांस लावत ही मोहीम यशस्वी केली. त्यामुळे एन पावसाळ्यात फुटलेला कालवा वेळेत पूर्ण करून तो गुणात्मक दृष्ठ्या स्थानिक ठेकेदार सुद्धा कुठेही कमी नाहीत हेच यातून दाखवून दिले आहे.
खरं तर कालव्या खालून जाणाऱ्या मोरीचे पाईप फुटल्याने ही आपत्ती ओढवली होती. याच मोरीचे फुटलेले पाईप व माती काढून तेथे नवीन पाईप घालणे वं त्यावर कालवा बांधकाम करणे हें काम खरं तर चॅलेंजिंग होते. मात्र तिलारीचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी वं वरिष्ठानी टाकलेला विश्वास युद्धपातळीवर काम पूर्ण करून टोपले यांनी खरा करून दाखवला. त्यामुळे आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत करा करण्याची गोवा सरकारची मागणी प्रकल्प अधिकाऱ्यांना पूर्ण करता आली.
संपूर्ण कालव्याचे नूतनीकरण आवश्यक
तिलारी प्रकल्प आणि त्याच्या कालवा बांधणीला तब्बल ४० वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. जुन्या पद्धतीने बांधकाम केलेल्या कालव्याच्या काॅंक्रीटच्या भिंती अनेक ठिकाणी ढासळल्या आहेत. त्यांना तडे गेले आहेत. याची दुरुस्ती होऊन पुन्हा हें कालवे किती काळ टिकतील याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. उलट गोवा राज्याने ज्या प्रमाणे जुन्या कालव्यांचे नवीन तंत्रज्ञान वं आधुनिक पद्धतीचा अवलंब करून कालव्यांची गोव्यात नव्याने बांधणी केली. त्याच पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांधणी झाल्यास ते सर्वकश हिताचे ठरणार आहे.