
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांची रायगड जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी भंडारा जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या तसेच सिंधुदुर्ग पुत्र असलेल्या जयप्रकाश परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे यांची बीड जिल्हा परिषद ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर बदली करण्यात आली आहे.
विशाल तनपुरे यांनी २० मे २०२२ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांच्या काळात चांदा ते बांदा आणि सिंधूरत्न विकास योजना या दोन योजनांच्या माध्यमातून ग्रामीण पर्यटन वाढीसाठी तसेच ग्रामपंचायतींना पर्यटक व्यवसायाकडे वळविण्यासाठी प्रयत्न ग्रामपंचायत विभागाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे झाला. जिल्हा परिषद शेस फंडातून तनपुरे यांनी स्वतःच्या संकल्पनेतून राबविलेली भजनी मंडळाना साहित्य पुरविणे ही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरली होती. सलग दोन वर्षे त्यांनी ही योजना यशस्वी राबविली आहे.
तर तनपुरे यांच्या जागेवर येणारे जयप्रकाश परब हे जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. यापूर्वी त्यांनी देवगड आणि वैभावडी पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून लक्षवेधी काम केलेले आहे. त्यानंतर त्यांची भंडारा जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी या पदावर बदली झाली होती. आता त्यांनी शासनाकडे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद देण्याची विनंती केली होती. त्यामुळे तनपुरे यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या जागेवर शासनाने त्यांची नियुक्ती केली आहे.
शासनाने जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे यांचीही बदली केली आहे. त्यांना बीड जिल्हा परिषद ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. काळे यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये या पदाचा पदभार स्वीकारला होता. अजून त्यांना दोन वर्षे झाली नव्हती. त्यांनी आपल्या काळात डिसेंबर २०२२ च्या रिक्त पदांच्या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावली होती. मात्र, काळे यांच्या बदलीचे रिक्त होणाऱ्या जागेवर शासनाने दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद मधील अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांत अजून एका पदाची भर पडली आहे.