
सावंतवाडी : सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर प्रवासी संख्या वाढत असल्याने उत्पन्नही वाढले आहे. सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात गतवर्षीच्या तुलनेत १०.९२ टक्के उत्पन्न आणि ४.५७ टक्के प्रवासी संख्या वाढली आहे. त्यामुळे या स्थानकांवर महत्त्वाच्या गाड्यांना थांबा आणि रेल्वे टर्मिनसला प्राधान्य मिळाले पाहिजे अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची असल्याचे सचिव मिहीर मठकर यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, आर्थिक वर्ष २०२४- २०२५ मध्ये सावंतवाडी स्थानकाचे एकूण प्रवासी उत्पन्न हे १६ कोटी १६ लाख २ हजार ९०५ एवढे आहे. तर एकूण प्रवासी संख्या ही ७ लाख ९९ हजार ७२७ एवढी आहे. प्रवासी उत्पन्न हे गेल्यावर्षीच्या तुलनेत १०.९२ टक्क्याने वाढले आहे. तसेच प्रवासी संख्या देखील ४.५७ टक्क्याने वाढली आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने सावंतवाडी रेल्वे टर्मिनस वर प्रवासी संख्या वाढत आहे तसेच हे स्थानक उत्पन्न वाढविणारे आहे असे रेल्वे प्रशासनाला पटवून दिले आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने कायमच प्रवाशांची गैरसोय होईल अशी कृती केली आहे त्यामुळे रेल्वे प्रवासी संघटनेने वेळोवेळी आंदोलने छेडली आहेत असे मिहीर मठकर यांनी सांगितले. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर मंजूर रेल्वे टर्मिनस लवकर पूर्ण करावे, रेल्वेचे शिल्पकार प्रा मधु दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे, कोकण रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा म्हणून वरचेवर मागणी केली आहे आणि प्रशासनाला पटवून दिले आहे असे त्यांनी सांगितले. कोकण रेल्वेने सध्या चाकरमानी गावी येत जात आहे. आरक्षण फुल्ल आणि प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. प्रवासी गर्दीत मिळेल तेथे बसून प्रवास करत आहेत. त्यामुळे या मार्गावर सावंतवाडी पर्यंत आणखी एक नवीन रेल्वे, तसेच सर्व रेल्वे गाड्यांना थांबा सावंतवाडी रेल्वे स्थानकावर मिळाला पाहिजे असे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी सांगितले.