
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त ग्रामपंचायतीच्या वतीने कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बचत गटातील महिलांसाठी कौशल्य विकास अंतर्गत पापड बनविण्याचे प्रशिक्षण दि. ०५ जानेवारी २०२६ रोजी यशस्वीपणे पार पडले. नववर्षाच्या सुरुवातीलाच महिलांना स्वयंपूर्णतेकडे नेणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रशिक्षणाचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच सपना सावंत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी उपसरपंच श्री. पास्ते, ग्रामपंचायत अधिकारी केशव पावरा, संस्था समन्वयक समीर शिर्के व प्रशिक्षक मीनाक्षी भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रशिक्षणात तांदळाचे, उडीदडाळीचे, रव्याचे व पालक पापड अशा एकूण सहा प्रकारचे पापड तयार करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. पापड तयार करण्यासाठी लागणारे घटक, प्रमाण, चव, दर्जा, साठवणूक तसेच घरगुती स्तरावर व्यवसाय सुरू करून त्याचे मार्केटिंग कसे करावे याबाबत २३ महिलांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामुळे महिलांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार असून आर्थिक स्वावलंबन वाढण्यास मदत होणार आहे. गावातच लघुउद्योग निर्माण होऊन स्थानिक उत्पादनांना चालना मिळेल. महिलांचे आत्मविश्वास वाढणे, बचत गट सक्षम होणे व गावाचा सर्वांगीण विकास साधणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश यशस्वीपणे साध्य झाला आहे.










