
मंडणगड : मंडणगड तालुक्यातील केळवत, शेनाळे, माहू, नारगोली, तुळशी, उमरोली, चिंचघर, घोसाळे, कडूक, सावरी, निगडी, भामघर चौकी, घुमरी या गावातील घाटांमध्ये धोकादायक वळणावर संरक्षक भिंती नसल्याने घाट मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरक्षा अनेक वर्षांपासून देवाच्या हवाली सोडण्यात आली आहे. सार्वजनीक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पंचायत समिती बांधकाम विभाग, पंतप्रधान ग्रामसडक योजना कार्यालय यांनी समस्येकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले आहे. विविध ठिकाणी होणाऱ्या अपघातानंतर सगळ्यांनाच घाटातील संरक्षक भिंतीची आवश्यकता भासते. या विषयावर काही काळ चिंतनानंतर विषय मागे पडत जातो. मात्र संबंधीत दोन्ही यंत्रणा याबाबत इतक्या निष्काळजी का हा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो.
तालुक्यातील या सर्व घाटांमध्ये पन्नासहून अधिक ठिकाणी तातडीने नव्याने संरक्ष भिंती उभारणे गरजेचे आहे. याशिवाय घाटातील सर्वच वळण व नागमोड्या वळणावर लोखंडी रेलींग असणे गरजेचे आहे पुर्वी जागोजागी असलेल्या विपुल वनसंपदेमुळे अपघात झाला तरी समस्येची तीव्रता तितकीशी जाणवत नव्हती. मात्र गेल्या दोन दशकात घाटमार्गांना लागून असलेल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने आता वाहने अपघात होऊन थेट दरीत जाण्याचे प्रमाण वाढले आहे. घाटात धोकादायक ठिकाणी संरक्षक भिंती असाव्यात याबद्दल कोणाचेही दुमत नाही. मात्र संबंधीत यंत्रणा वर्षानुवर्षे नागरीकांची मागणी असतानाही घाटातील संरक्षक भिंतींच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने, गंभीर अपघात व मोठ्या जीवीत हानीची प्रतिक्षा अधिकारी वर्ग करीत आहे का ? असा सहज प्रश्न तालुकावासीय विचारत आहेत.
सद्यस्थीतीचा विचार करता तालुक्यातील घाट मार्गातील सर्वच रस्ते किमान तीन ते चार दशके आधी बनविण्यात आले आहेत . बदलत्या काळात त्यामध्ये कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही, अनेक वेळा रस्त्याचे दुतर्फा असलेली झाडी वेळेवर तोडण्यात येत नाही, गार्ड स्टोन, फार्लग स्टोन, वा रस्त्याची स्थिती दर्शविणाऱ्या कोणत्याही खुणा मार्गावर आढळून येत नाहीत. त्यामुळे आजच्या काळातील मोठी व वेगाने चालणारी वाहने एकमेकांवर आदळून वरच्यावर अपघात घडतात किंवा वाहनांचा ताबा सूटून वाहने दरीत कोसळतात. या गंभीर परिस्थितीचे सर्वच यंत्रणांनी नव्याने अवलकोन करणे गरजेचे आहे व त्यादृष्टीने उपाययोजना आणि कृती करणे गरजेचे आहे. रस्त्यावर खड्डे, मोऱ्या, लहान मोठ्या पुलांची निर्मीती, आणि जागोजागी संरक्षक भिंतीची गरज आहे. त्यामुळे अपघात घडला तरी मोठी जीवीत व वित्तहानी टाळणे शक्य होणार आहे.