मालवणात २९ ते ३१ जानेवारीला व्यापारी एकता मेळावा

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: January 16, 2024 05:46 AM
views 180  views

मालवण : मालवणात होणारा जिल्हा व्यापारी एकता मेळावा हा भव्यदिव्य होणारआहे. मेळाव्यास सुमारे ५ हजार व्यापारी बांधव उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यातून मनोरंजन, प्रबोधन, व्यापार यांचा मिलाफ साधण्यात येणार आहे. सर्व व्यापारी बांधवांच्या सहकार्याने हा मेळावा यशस्वी करू, असा मनोदय मालवण येथे जिल्हा व्यापारी महासंघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर व्यापारी बांधवांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. 

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३६ वा व्यापारी एकता मेळावा मालवणात २९ ते ३१ जानेवारी रोजी होणार असून या मेळाव्याच्या नियोजनाच्या दृष्टीने मालवण येथे मालवण व्यापारी संघाच्या कार्यालयात जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज सायंकाळी संपन्न झाली. यानंतर व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन मेळावा आयोजनाबाबत माहिती दिली. यावेळी  जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर, उपाध्यक्ष सागर शिरसाट, महेश नार्वेकर, संजय भोगटे, सहकार्यवाह चंद्रकांत जठार, मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, कार्यवाह रवींद्र तळाशीलकर, खजिनदार गणेश प्रभुलीकर, उपाध्यक्ष नाना पारकर, अशोक सावंत, सहकार्यवाह अभय कदम, सदस्य हर्षल बांदेकर, संदिप शिरोडकर, मंदार ओरसकर, अमोल केळूसकर, हरेश देऊलकर, शैलेश मालंडकर, सरदार ताजर, विजय चव्हाण, योगेश बिलवसकर, उमेश शिरोडकर, महेंद्र पारकर, स्वीकृत सदस्य श्रीकृष्ण तारी, अरविंद ओटवणेकर, दिनेश मुंबरकर, हेमंत शिरपूटे, तालुकाध्यक्ष प्रमोद ओरसकर, सचिव अरविंद नेवाळकर, दशरथ कवटकर, नितीन तायशेटे, नितीन वाळके, मसूद मेमन, विजय केनवडेकर, महेश अंधारी, गोविंद चव्हाण, सुहास ओरसकर, विठ्ठल साळगावकर, सुनील परुळेकर, पांडू करंजेकर, मुकेश बावकर, राजा शंकरदास, नाना साईल यांसह जिल्हाभरातील व्यापारी सदस्य उपस्थित होते. 

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर म्हणाले, जिल्हा व्यापारी महासंघाचा  ३६ वा व्यापारी मेळावा मालवणात बोर्डिंग मैदानावर होत असून मालवण व्यापारी संघांचे ५० वे वर्षही साजरे होत आहे. यजमान मालवण व्यापारी संघातर्फे या मेळाव्याचे चांगले नियोजन करण्यात येत आहे. जास्तीत जास्त व्यापारी बांधवांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असेही पारकर म्हणाले.

यावेळी नितीन वाळके यांनी व्यापारी मेळाव्याच्या रूपरेषेबद्दल माहिती दिली. दि. २९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सागरी महामार्ग ते बोर्डिंग ग्राउंड अशी व्यापाऱ्यांची स्वागत रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर बोर्डिंग ग्राउंड येथील विविध  स्टॉलचे उदघाटन माजी खासदार निलेश राणे यांच्या होणार आहे. त्यानंतर ७ वाजल्यापासून माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून चला हवा येऊ द्या हा  कार्यक्रम सादर होणार आहे. तर ३० रोजी सायंकाळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी पुरस्कृत केलेले व मालवण मधील कलाकारांचा समावेश असलेले अयोध्या हे महानाट्य सादर होणार आहे. ३१ रोजी मेळाव्याचा मुख्य कार्यक्रम होणार असून त्यामध्ये व्यापाराच्या दृष्टीने वैचारिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच २९ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ६.३० या वेळेत खेळातून व्यापार मार्गदर्शन कार्यशाळा होणार आहे. तसेच विनोद मेस्त्री यांचा 'मला शिवाजी व्हायचंय' हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यापार नीतीची सांगड घालून व्यापार कसा वाढविता येईल, याबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार आहे, असेही वाळके म्हणाले.

या मेळाव्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत,  शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यासह लोकप्रतिनिधीना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे सुपुत्र अमेय प्रभू, किरकोळ व्यापारी देशव्यापी संघटनेचे (CAT) अध्यक्ष श्री. खंडेलवाल हे या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. व्यापाऱ्यांना उपास्थित राहण्यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरु करण्यात आली आहे, असेही नितीन वाळके यांनी सांगितले. तर सर्व व्यापाऱ्यांनी सहकार्य करत एकजुटीचे दर्शन घडवून हा मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन उमेश नेरुरकर यांनी यावेळी केले.