देवबाग मोबारवाडीतील पर्यटन जेटीचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार ; निलेश राणेंची ग्वाही

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली होती मंजूरी | शिवसेनेच्या आमदार-खासदारांमुळ तब्बल 10 वर्षे रखडलं काम
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: December 14, 2022 19:27 PM
views 281  views

मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दहा वर्षांपूर्वी देवबाग मोबारवाडी मध्ये रॉयल जेटी मंजूर केली होती. मात्र २०१४ मध्ये शिवसेनेच्या आमदार, खासदारांच्या दुर्लक्षामुळे हे काम अद्याप रखडले आहे. याठिकाणी भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी बुधवारी भेट दिली. या कामाच्या सद्यस्थितीची शासन पातळी वरून माहिती घेऊन हे जेट्टीचे काम लवकरात लवकर हाती घेऊ, अशी ग्वाही श्री. राणे यांनी दिली आहे.


देवबाग मोबारवाडी मधील पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी २०१४ पूर्वी येथे रॉयल जेटी नामक पर्यटन जेटी मंजूर करून घेतली होती. मात्र त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत राणेंचा पराभव झाल्यानंतर या जेटीचे काम रखडले आहे. मोबरेश्वर नौका विहार जलपर्यटन सहकारी संस्था देवबाग मोबारवाडी यांनी ह्या जेटीचे काम सुरु होण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. भाजपा नेते निलेश राणे यांच्या निदर्शनास सदरील बाब आणून दिल्यानंतर आज सायंकाळी निलेश राणे यांनी याठिकाणी भेट दिली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, अवी सामंत यांच्यासह  संदीप तांडेल, सचिन धुरी, दिलीप पेडणेकर, गणेश कुमठेकर, किरण धुरी, केतन तोरस्कर, दाजी वायंगणकर, मयूर पेडणेकर, महेंद्र धुरी, उचित तांडेल, कैलास तांडेल, गणेश राऊळ, हर्षद कुमठेकर, रवींद्र तांडेल, तुकाराम तांडेल, रुपेश कांबळी, विशाल धुरी, अनिल तोरस्कर, किशोर तांडेल, बंटी कुबल, यशवंत बांदेकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. सदरील बंधाऱ्याच्या कामाला राणे साहेबांच्या कालावधीत मंजुरी मिळाली आहे. मात्र त्यानंतर आठ - साडेआठ वर्ष हे काम रखडले आहे. त्यामुळे या कामाची फाईल मंत्रालयात कोणत्या स्थितीत आहे, याची माहिती घेऊन याचा पाठपुरावा केला जाईल, सदरील काम लवकरच पूर्ण करू अशी ग्वाही निलेश राणे यांनी दिली.