महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल सुरु करू नये | सिंधुदुर्गवासियांना टोलमाफी मिळावी

विधानसभा अधिवेशनात आ.वैभव नाईक यांनी उठविला आवाज
Edited by: भरत केसरकर
Published on: March 13, 2023 18:47 PM
views 131  views

मुंबई : विधानसभा अधिवेशनात कोकणातील आमदारांनी मुंबई गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामाबाबत लक्षवेधी मांडल्याने मुंबई मंत्रालय येथे आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली  मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून  महामार्गाच्या अनेक प्रलंबित कामांकडे लक्ष वेधले. संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत सिंधुदुर्गातील टोल सुरु करू नये. सिंधुदुर्ग वासियांना टोल माफी मिळावी, अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी ना. रविंद्र चव्हाण व राष्ट्रीय महामार्गाच्या दिल्ली येथील अधिकाऱ्यांकडे केली. तसेच आज मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नाबाबत विधानसभा अधिवेशनात लागलेल्या लक्षवेधीतही आ.वैभव नाईक टोल प्रश्नी आवाज उठविला. त्यावर ना. रविंद्र चव्हाण यांनी  सकारात्मकता दर्शविली.


त्याचबरोबर आढावा बैठकीत पावशी येथील ओव्हरब्रीज, वागदे येथील अर्धवट असलेल्या एका लेनचे काम पूर्ण करावे, अपूर्ण असलेले गटार, सर्व्हिस रोड, पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने अर्धवट असलेली कामे,  ऍप्रोच रोड, अपघात होणारी ठिकाणी तसेच नागरिकांना उदभवणाऱ्या समस्या याकडे आ. वैभव नाईक यांनी लक्ष वेधत समस्या तात्काळ मार्गी लावण्याची मागणी केली.  त्यावर समस्या सोडविण्याची ना. रवींद्र चव्हाण यांनी ग्वाही दिली.


शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव साळुंखे आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.