शिरगांवच्या पावणादेवीचा आज जत्रोत्सव

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 21, 2024 07:37 AM
views 118  views

देवगड : कोकणभूमीला निसर्गाने भरभरून नयनरम्य सौंदर्य दिले आहे. पूर्वेला सहयाद्रीच्या पर्वतरांगा तर दुसऱ्या बाजूने फेसाळणारा अरबी समुद्र. पर्शुरामाच्या या कोकण भूमीने नेहमीच पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशा या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर जागतिक पर्यटन क्षेत्राचा मान मिळाला आहे. नयनरम्य पर्यटन स्थळांबरोबर गावागावातील पुरातन देवालयांचा परिसर येणाऱ्या भाविकांचे मन प्रसन्न करतो. देवगड तालुक्यातील बारा वाडया आणि तेरावा गावठण अशा विस्तारलेल्या शिरगांव येथील जागृत ग्रामदैवत श्री. देवी पावणाई. माहेरवासियांच्या संकटाला धावून जाणारी आणि भक्तांच्या नवसाला पावणारी अशा या विश्वाच्या माऊलीची सर्वत्र ख्याती आहे. या मंदिरामध्ये आज २१ जाने. रोजी पौष महिन्याच्या पुत्रदा एकादशी दिवशी हरिनाम सप्ताह (जत्रोत्सव) साजरा होत आहे.

१८ जानेवारी १९८८ रोजी या मंदिराचा जिर्णोद्धार संत गगनगिरी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. पुढे १ जून १९९७ साली याच मंदिर परिसरातील श्री देव गोमेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. १९ मे २०११ रोजी मंदिराच्या दर्शनी बाजूला ग्रामस्थ मंडळी, बारा-पाच मानकरी, देणगीदार यांच्या सहकार्यातून सुसज्ज असा देखणा आकर्षक सभामंडप बांधण्यात आला. श्री पावणादेवी देवालयाचा परिसर अंदाजे २३ एकरामध्ये पसरला आहे. मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख आहे. ही देवी साडेतीन गावांची मालकीण असून यामध्ये शिरगांव, शेवरे, ओंबळ व अर्धा वळीवंडे गाव (खराडयापर्यंत) यांचा समावेश आहे. देवालयाच्या गाभाऱ्यात श्री पावणाई देवीसह तिच्या डाव्या बाजूला श्री देव रवळनाथ, श्री देवी विठ्ठलादेवी, श्री काळका देवी, श्री नवलाईदेवी तर उजव्या बाजूला श्री महालक्ष्मी व श्री खजराईदेवी या देवतांची पाषाणे आहेत. या पाषाणांच्या बाजूला बारा आकार व चार चाळयांची रास आहे. श्री पावणाई देवी व श्री देव रवळनाथ या दोघांच्यामध्ये राजसत्ता व पूर्वसत्तेचे प्रतीक आहे. देवालयात पाच तरंग, एक निशाण, एक अबदागीर व बारा पूर्वजांचे प्रतीक आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहात साडेतीन गावांचे प्रतीक व भावई देवीचे पाषाण आहे. श्री भावई देवीच्या उत्सवादिवशी हे पाषाण सजविले जाते. माहेरवाशिनी 'पांढरी' या नावाने तिचा संकटकाळी धावा करतात. या देवीचा कौलप्रसादाचा व्यवहार डाव्या बाजुने होतो. म्हणून तिला 'डावरी' असेही संबोधिले जाते. या देवालयाच्या परिसरात श्री देव गोमेश्वर (आकारी ब्राह्मण) मंदिर आहे. या मंदिराच्या पुढे गेल्यावर घनदाट झाडीत श्री देव कामेश्वर मंदिर आहे. या देवालयात श्री पावणाई देवी माहेरी म्हणून तरंगासह येते. पूर्वी ती महिनोमहिने माहेरी राहायची, आता बारा-पाचांच्या मतांवर तिचा माहेरवास अवलंबून असतो. श्री देव कामेश्वर व श्री देव गोमेश्वर मंदिरात पाच दिवस पावित्र्य पाळूनच जाता येते. मात्र या मंदिरात पिंडीपर्यंत ब्राह्मण किंवा त्या त्या देवातांच्या वसांनाच प्रवेश आहे. येथील देवलयांसमोर तुळशी वृदांवने नाहीत. तर बाराची तुळस व बाराची रास तावडेवाडी येथे आहे. या तुळशीचा विवाह बारा-पाच मानकरी जमून लावतात. त्यानंतरच गावातील सर्व तुळशी विवाह सोहळे पार पडतात. आज ही परंपरा गावाने जोपासली आहे.८४ खेडयांचा अधिपती साळशी गावची इनामदार श्री देवी पावणाई, जामसंडे गावचे ग्रामदैवत श्री दिबर्बादवी या शिरगावंच्या श्री पावणाई देवीच्या बहिणी आहेत.

तर मालवण तालुक्यातील आचरे गावचे इनामदार श्री देव रामेश्वर हे भाऊ आहेत. साळशी गावची इनामदार श्री पावणाई देवी ही श्रीमंत तर शिरगांवची श्री पावणाई देवी ही गरीब त्यामुळे साळशीच्या आपल्या बहिणीकडे रूसवा करून पश्चिमेला पुढा करून ती उभी आहे, अशी अख्यायिका सांगितली जाते. बाराच्या कुळाच्या नैवेद्याने देवस्थानातील वार्षिकांना सुरुवात होते. दसरा (नवरात्रोत्सव), भावई उत्सव, पोवती पौर्णिमा, देसरूड, हरिनाम सप्ताह, त्रिपुरारी पौर्णिमा, होलिकोत्सव, कवळणे आदी उत्सव व वार्षिक बारा-पाच मानकरी, ग्रामस्थ मंडळी मिळून साजरे करतात. या देवीच्या कृपाशीर्वादामुळे दरवर्षी भाविकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या देवालयाचा परिसर शासनाच्या पर्यटन स्थळ विकास योजनेंतर्गत 'क' वर्ग पर्यटन स्थळ म्हणून सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे देवालयाच्या सौंदर्यांत भर पडली आहे.