विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जि. प. चा प्राथमिक शिक्षण विभाग सज्ज..!

शिक्षक, विद्यार्थी, पालक,शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी यांचाही सहभाग | अद्याप गणवेश प्राप्त न झाल्याने जुन्याच गणवेशावर स्वगात
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 14, 2024 14:12 PM
views 227  views

सिंधुदुर्गनगरी | लवू म्हाडेश्वर | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळा शनिवारी दिनांक १५ जून पासून सुरू होत असून, विद्यार्थ्यांचे नियमित व  स्काऊट गाईड  गणवेश,  शूज व सॉक्स,  पाठ्यपुस्तके, मध्यान भोजन या सर्व  शासकीय सुविधांसह  विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी   शिक्षण विभाग  सज्ज  झाला आहे.  जिल्ह्यातील शाळांमध्ये  ५५६ शिक्षण सेवकांचे बळ आता मिळाले आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागताबरोबरच शिक्षकांच्या आंदोलनही असणार आहे! त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्रशासन  शाळा व्यवस्थापन समित्या, पालक यांचा मिळणारा प्रतिसाद  महत्वाचा ठरणार आहे!

दरम्यान शासनाने पूर्ण राज्यात एक गणवेश असे निश्चित केले असेल तरीही अद्याप प्रत्यक्ष गणवेश प्राप्त न झाल्याने शाळेचे पाहिले काही दिवस जुन्या गणवेशावरच विद्यार्थांना यावे लागणार आहे.

पहिल्या इयत्तेच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या बाल विद्यार्थ्यांसाठी  हा महत्त्वाचा क्षण असून शिक्षणाचे पहिले पाऊल या विद्यार्थ्यांचे असणार आहे. याबाबत शासनाने  शालेय अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना एक नियमित गणवेश,  एक स्काऊट आणि गाईड गणवेश,  शूज व सॉक्स मोफत देण्याच्या राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार  या गणवेशाचे कापड  सिंधुदुर्ग  जिल्ह्यात दाखल झाले आहे. हे सर्व कापड राज्य शासनाने खरेदी करून  सर्व शाळांना पुरविण्यात येत असल्यामुळे प्राथमिक शाळांचे विद्यार्थी एकसमान गणवेशात  दिसणार आहेत. यावेळी प्रथमच  स्काऊट गाईड चा एक गणवेश  विद्यार्थ्यांना मिळत आहे. तर शूज व सॉक्स साठी 54 लाख 49 हजार 490 रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. शनिवारी  १५ जून पासून जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सुरू होत असून शिक्षण विभागाची धावपळ सुरू झाली आहे. गटशिक्षणाधिकारी व अन्य रिक्त पदे  मोठ्या प्रमाणात असली तरीही  शिक्षण विभागाचा कारभार गतिमान झाला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे स्वागत व पाठ्यपुस्तकांचे वितरण यासह  गणवेश वितरण  शूज सॉक्स खरेदीसाठी पैशाचे वितरण हे काम शिक्षण विभागाने युद्ध पातळीवर हाती घेतली आहे. 

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५५६ शिक्षण सेवकांच्या नियुक्त्या नुकत्याच झाल्या असून यात  २७६ महिला व २८०  पुरुष शिक्षकांचा समावेश आहे. गेले काही महिने  शिक्षक पदांमुळे अनेक प्राथमिक शाळा समोर  मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता शिक्षकांचे हे बळ मिळाल्यामुळे शाळेच्या प्रारंभापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले आहे. शिक्षकांना अभावी शाळा बंद राहणार नाही अशी हमी आता  प्रशासनाला देता आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  मकरंद देशमुख व शिक्षणाधिकारी डॉक्टर गणपती कमळकर यांनी  याबाबतचे सर्व नियोजन  केले असून  विद्यार्थ्यांसाठी मिळणाऱ्या सुविधा  सुलभपणे मिळाव्यात  असा प्रयत्न केला आहे.

 यावेळी प्रथमच राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेश देण्याची चांगली योजना राबविली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी  याबाबत महत्वकांक्षी निर्णय घेतले आहेत. नियमित गणवेश व्यतिरिक्त स्काऊट गाईड  राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. त्यासाठी ड्रेस कोड नुसार एकाच रंगाचे  गणवेशाचे कापड  राज्य सरकार मार्फत खरेदी करून  सर्व शाळांना पोहोच केले जाणार आहे. नियमित गणवेश बचत गटांमार्फत  विद्यार्थ्यांना पुरविले जातील स्काऊट गाईड  गणवेश  शाळा व्यवस्थापन समिती मार्फत  विद्यार्थ्यांना पोच करण्याचे नियोजन शाळा व्यवस्थापन समितीकडून करण्यात आले आहे. गणवेशाचे  पूर्ण कापड  शाळा सुरू होण्यापूर्वी  जिल्ह्यात दाखल झाले असून  ते प्रत्येक तालुक्याच्या गरजेनुसार व विद्यार्थी संख्येनुसार  प्रत्येक शाळांपर्यंत  पोच करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने  विद्या पातळीवर हाती घेतले आहे. विद्यार्थ्यांना हे दोन्ही गणवेश वेळेत मिळावे असे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या बूट व सॉक्स साठी 54 लाख 49 हजार 490  रुपयांचा निधीही प्राप्त झाला असून  जिल्ह्यातील सर्व शाळा मधील मुलांसाठी  हा वेळेत पोच होईल  अशी माहिती ही  प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. 

यावर्षीपासून विद्यार्थ्यांसाठी १२ रेसिपी : खिचडी बंद 

 शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविल्या जाणाऱ्या  मध्यान भोजन व्यवस्थेत  राज्य शासनाने बदल केला आहे. विद्यार्थ्यांना दर दिवशी मिळणारी खिचडी बंद करून त्याला दर दिवशी  वेगळ्या पद्धतीच्या बारा रेसिपी  दिल्या जाणार आहेत. याशिवाय अंडी व केळी  यांचाही समावेश असणार आहे. या सर्व सुविधा पुरविताना  काही तांत्रिक अडचणी असून  जिल्हा प्रशासन  शाळा व्यवस्थापन समिती पालक शिक्षक  त्यांना यातून मार्ग काढावा लागणार आहे.


पहिल्या दिवशी शिक्षण समितीचे आंदोलन


 प्राथमिक शिक्षक संघटनांचे  राज्यव्यापी आंदोलन शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे १५ जून रोजी होणार आहे. शिक्षक संघटनांचे अनेक प्रश्न शासन पातळीवर प्रलंबित आहेत. त्याची दखल शासनाने घ्यावी म्हणून शिक्षक संघटना आक्रमक आहेत. मात्र शनिवारी सकाळची शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांचे स्वागत व पाठ्यपुस्तकाच्या वितरणाचा कार्यक्रम होऊन शिक्षक समितीचे जिल्हाधिकारी भावना समोर आंदोलन सुरू होईल असा अंदाज आहे. शिक्षक समितीने  शालेय विद्यार्थ्यांच्या  अनेक प्रश्नाकडे  या आंदोलनाद्वारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे. राज्य शासनाने संचमान्यता आणि शिक्षक निर्धारण संबंधाने दि.१५ मार्च २०१४ रोजी निर्गत केलेल्या शासन निर्णयानुसार प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर व्यपगत होणार आहेत. तसेच सेवानिवृत्त शिक्षकांना कधी पटाच्या शाळेत मानधनाबर नियुक्या करण्याचा निर्णय सुद्धा सर्वकष विचार करता पूर्णतः चुकीचा आहे. त्याचप्रमाणे इयत्ता १ ते ५, इयत्ता ६ ते ८ आणि मुख्याध्यापक पदाचे नव निर्धारण विद्याध्याँच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनात अडसर निर्माण करणारे आहे. आदी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघटनेने राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. व शाळेच्या पहिल्या दिवशी हे लक्षवेधी आंदोलन होणार आहे.