सुडबुद्धीला कंटाळून राजीनामे..?

मंदार नाईक यांचा आरोप
Edited by: विनायक गावस
Published on: February 12, 2024 14:26 PM
views 54  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 80% मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संदीप दळवी व गजानन राणे यांच्या सुडबुद्धीला कंटाळून राजीनामे दिले. तेच आज माजी आमदार परशुराम उपरकरांवर टीका करतायेत हे अतिव हास्यास्पद आहे. मुळात सावंतवाडी सहित जिल्ह्यात मेळाव्यासंबंधी लावलेले बॅनर हे वर्षानुवर्षे पक्षाचे काम केलेल्या माजी मनसैनिकांनी उस्फूर्तपणे लावले आहेत. एवढेही संदीप दळवींना कळू नये हे दुर्दैव आहे. वास्तविक सिंधुदुर्ग नाही तर मुंबईत त्यांच्या प्रभागात सुद्धा बॅनरवर फोटो टाकला नाही म्हणून कार्यकर्त्यांशी हुज्जत घालणाऱ्या दळवींच्या बुद्धीची कीव करावी तेवढी कमीच आहे असा टोला उपरकर समर्थक मंदार नाईक यांनी हाणला आहे.

ते ज्या आरोस गावचे मूळ रहिवासी आहेत त्याच गावात मनसेच्या शाखेच्या सदस्यांनी राजीनामे देऊन शाखा पूर्णपणे बरखास्त केली. त्या गावात पैसे देऊन भाडोत्री माणसं बैठकींना आणावी लागतात हे संदीप दळवींचे आजपर्यंतचे पक्ष कार्य सावंतवाडीत सर्वश्रुत आहे. मागील 40 वर्षात कार्यकर्त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होणारे व त्यांच्या मदतीला धावून जाणारे जीजी उपरकर कुठे आणि पक्षातील नवोदित कार्यकर्त्यांना क्रिकेट स्पर्धा किंवा पक्षाचे कार्यक्रम करा मी पैसे पुरवतो असे सांगून नंतर फोन न उचलण्याचे प्रकार करून पक्षातील कार्यकर्त्यांना आर्थिक दृष्ट्या अडचणीत आणणारे संदीप दळवी कुठे हे जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिकांना चांगलेच माहिती आहे.

इ स्टोर व ग्रामीण कुटा बँक मार्केटिंग मध्ये फसवणूक झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना पैसे परत मिळवुन देतो असे सांगत मेळाव्यासाठी भर भरून आणले गेले, त्यांच्यासाठी प्रेस घेण्यात आल्या मात्र त्यानंतर त्याचे पुढे काय झाले? पाणी कुठे मुरले याचे आधी उत्तर तुम्ही जिल्ह्यातील जनतेला देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे उपरकर यांनी आजपर्यंत अनेक मोर्चे अनेक आंदोलन स्वबळावर जनतेसाठी केली मग ते कोविड चे प्रश्न असो किंवा आरोग्याचे त्यामुळे निदान तेवढं तरी तुम्ही करून दाखवा असं प्रति टोला नाईक यांनी लगावला.

कोणतेही आंदोलन "जोमाने काम करा मी तुमच्यासाठी खिसा रिकामा करतो" असे मोठ्या तावातावात सांगणाऱ्या संदीप दळवींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षच अगदी रिकामा करून टाकला हे खरे वास्तव असून असून संदीप दळवी यांनी वेळीच आपल्या जिभेला लगाम लावावा अन्यथा आम्ही "बाजा" वाजवू एवढं लक्षात ठेवावं असा सूचक इशारा मनसेचे माजी पदाधिकारी तथा उपरकर समर्थक मंदार नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.