महावितरणसमोर ढोल बडवत तिरडी आंदोलन | माडखोल ग्रामस्थांनी धरलं अधिकाऱ्यांना धारेवर

Edited by: विनायक गावस
Published on: August 04, 2023 15:05 PM
views 191  views

सावंतवाडी :  विजेच्या लपंडावासह गावला कायमस्वरूपी वायरमन नसल्यानं संतप्त झालेल्या माडखोल ग्रामस्थांनी सावंतवाडी वीज वितरण कार्यालयाबाहेर ढोल बडवत प्रतिकात्मक तिरडी आंदोलन छेडलं. महावितरण प्रशासनाच लक्ष वेधून इशारा देऊन देखील त्याची दखल न घेतली गेल्यानं आज हे टोकाचं पाऊल माडखोल ग्रामस्थांनी उचललं. यावेळी वीज वितरणच्या कारभाराबाबत ग्रामस्थांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नेत्यांनी नाराजी व्यक्त करत महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. मनुष्य बळ कमी असल्याचं कारण देणाऱ्या अधिकाऱ्याला बील वसुलीच्या वेळी तसेच कनेक्शन कट करायला येणारी माणसं कुठून येतात ? असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी विचारला.

माडखोल गावातील ग्रामस्थांनी विजेच्या लपंडावासह कायमस्वरूपी वायरमन मिळण्याबाबत तक्रार केली होती. परंतु, याची दखल न घेतली गेल्यानं माडखोल गावातील ग्राहकांनी वीज वितरण कार्यालयाला धडक देत आंदोलन छेडलं. माडखोल गाव विस्ताराने मोठा असून वारंवार विजेच्या समस्यांमुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. मागील सहा महिन्यांपासून माडखोलमध्ये दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जीवावर कारभार चालत आहे. सहा महिन्यापुर्वी परमनंट वायरमची माडखोल येथुन कुडाळ येथे बदली झाल्यानंतर ते पद रिक्त असून वेळोवेळी मागणी करुनही माडखोल गावासाठी परमनंट वायरमनची नियुक्ती होत नाही आहे. त्यामुळे आज महावितरण कार्यालयाबाहेर माडखोल ग्रामस्थांनी ढोलताशे बडवत प्रतिकात्मक अंतयात्रा काढून तिरडी आंदोलन केलं.

यावेळी माडखोल गावातील ग्राहकांनी विजेच्या संदर्भात तक्रार व नियमित कर्मचारी मिळण्यासंदर्भात दिलेल्या आंदोलनाच्या नोटीसीनुसार कार्यकारी अभियंता महावितरण  कुडाळ या कार्यालयाकडे नियमित कर्मचारी मिळण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत शाखा कार्यालय माडखोल येथील संतोष डोईफोडे यांना माडखोल करीता नियुक्त करण्यात आलेले आहे. तसेच नवीन नियमित कर्मचारी मिळेपर्यत संतोष डोईफोडे यांची नियुक्त करण्यात आलेली आहे असं पत्र उप कार्यकारी अभियंता यांनी आज माडखोल सरपंच, उपसरपंच यांना दिल.

यावेळी माडखोल ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावल. तर जोपर्यंत मागण्या पूर्ण करत नाहीत तोवर गावात वीज बील द्यायला जाऊ नका असा आक्रमक पवित्रा माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांनी घेतला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शिवसेना ठाकरे गटाचे बाळा गावडे, उपसरपंच कृष्णा उर्फ जीजी राऊळ यांनी देखील वीज वितरण अधिकाऱ्यांंना धारेवर धरत ग्रामस्थांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्यास सांगितले. 

याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे बाळा गावडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, माडखोल सरपंच सृश्नवी राऊळ, उपसरपंच कृष्णा उर्फ जीजी राऊळ, सुर्यकांत राऊळ, आबा सावंत, नारायण राऊळ, राजकुमार राऊळ, संतोष राऊळ, हिदायतुल्ला खान, यशवंत गावडे, विलास राऊळ, स्वप्नील लातये यांसह मोठ्या संख्येने माडखोल ग्रामस्थ उपस्थित होते.