' ब्लड बॅंक'ला टाळं ठोकायची वेळ..?

शल्य चिकित्सकांच्या आदेशाला केराची टोपली..? | युवा रक्तदाता संघटना, सामाजिक कार्यकर्ते आक्रमक
Edited by: विनायक गावस
Published on: October 03, 2023 17:40 PM
views 234  views

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीतील म्हत्वाची दोन्ही पद रिक्त असल्यानं कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जीवावर ब्लड बँकेचा कारभार सुरु आहे. यातील रक्तपेढी अधिकारी मेडीकल लिव्हवर असून प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद रिक्त आहे. यामुळे २४ तास काम करायची नामुष्की कंत्राटी महिलेवर आली असून एका महिलेच्या जीवावर ब्लड बँकेचा कारभार सुरु आहे. गेले सहा महिने अशीच काहीशी परिस्थिती असून यामुळे ब्लड बँकेला टाळ पडण्याची वेळ आली आहे. तर चार महिन्यांत दोन महिलांना प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदावर हजर होण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांनी देऊन देखील अद्याप त्यातील एकही हजर राहीलेली नाही. शल्य चिकित्सकांच्या आदेशालाच त्यांनी केराची टोपली दाखवली असून यामुळे सावंतवाडीची रक्तपेढी बंद होण्याच्या मार्गावर आहे. रक्तासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर शासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्यामुळे युवा रक्तदाता संघटनेसह सामाजिक कार्यकर्तांनी आक्रमक पवित्रा घेत ला आहे. सात दिवसांत पद न भरली गेल्यास तीव्र आंदोलनाचा गर्भीत इशारा दिला आहे.

उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत दोन पद मंजूर आहेत. त्यातील एक रक्तपेढी अधिकारी मेडीकल लिव्हवर असून प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद रिक्त आहे. त्यामुळे सद्यस्थिती रक्तपेढीला वाली उरलेला नाही. अशीच काहीशी परिस्थिती प्रयोगशाळेतही आहे. त्यामुळे प्रचंड ताण रक्तपेढीत आहे. रक्तपेढीतील दोन्ही पदांवर जबाबदार व्यक्ती नसल्यानं कंत्राटी महिला तंत्रज्ञाच्या जीवावर ब्लड बँकेचा कारभार सुरु आहे. २४-२४ तास काम करायची नामुष्की यामुळे त्या कंत्राटी महिलेवर आली आहे. त्यात रक्ताचा तुटवडा व एलायजा टेस्ट बंधनकारक केल्यानं रूग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला देखील सामोरं जावं लागतं आहे.

दरम्यान, गेल्या चार महिन्यांत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी आदेश देऊन देखील‌ प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे पद भरलं गेललं नाही. रक्तपेढी विभागातील कामकाजाच्यादृष्टीने महिला रुग्णालय कुडाळ येथे कार्यरत असलेल्या  प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुप्रिया सातोसकर यांना पुढील आदेश होईपर्यंत उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील रक्तपेढी विभागात कामकाज करण्यासाठी पाठविण्यात यावे असे आदेश शल्य चिकित्सकांनी दिले होते.  मात्र, दोन महिने त्या हजर न झाल्यानं येथील प्रणाली चिपकर यांना आदेश दिले. मात्र, त्या देखील अद्याप हजर झालेल्या नाहीत. हजर होण्यास दिरंगाई केल्यास अथवा हजर न झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ प्रमाणे शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल असं आदेशात म्हणून देखील जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आदेशाला दोघींकडून केराची टोपली दाखवली गेली आहे. यामुळे ब्लड बँकेतील दोन्ही पद रिक्त असून सायंकाळी ६ नंतर रक्तपेढीला कुलूप घालण्याची वेळ आली आहे. 

गेले पाच महिने हा प्रश्न आहे. एका कंत्राटी महिलेच्या जीवावर ब्लड बँक सुरू असून कामाचा भार पडत आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी आदेश देऊन देखील‌ दोन्ही पैकी एकही तंत्रज्ञ हजर झालेली नाही. राजकीय दबाव यामागे असण्याची शक्यता आहे. आज उपसंचालक डॉ. भिमसेन कांबळे यांच्याशी आपलं बोलणं झालं आहे. त्यांना या परिस्थितीची कल्पना दिली आहे. सरकारी भरती होईपर्यंत दोन्ही पदांवर तंत्रज्ञ देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे अहोरात्र मेहनत घेणाऱ्या रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल. सणासुदीच्या दिवसांत येथील कंत्राटी महिला कामावर होती‌. रक्तपेढीत प्रयोगशाळा तंत्रज्ञाच काम ती पाहत आहे. २४ तास सेवा देत असताना जर ती आजारी पडली तर रक्तपेढी बंद होईल. आरोग्य क्षेत्रात काम करणारी भरपूर माणसं सावंतवाडीमध्ये आहेत. इतर ठिकाणी अशी माणसं नाहीत. त्यामुळे याची दखल घेऊन प्रशासनान ही पद भरावीत‌, उपसंचालकांनीही आठ दिवसात ही पद भरण्याचे आदेश दिलेत *: राजू मसुरकर, अध्यक्ष, जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान तथा माजी नगरसेवक*

रक्तपेढी बंद होण्याच्या परिस्थितीत आहे. येथे दहा वर्ष काम केलेल्या लोकांना शासकीय सेवेत घेतलं जातं नाही. आज याच एका कंत्राटी महिलेच्या जीवावर ब्लड बँकेचा कारभार सुरु आहे. २४ तास ती महिला सेवा देत आहे. ती देखील माणुस असून एक स्त्री आहे याचा विचार शासनाने करायला हवा. त्यामुळे अशांना कामात रुजु करून घेत रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लावावा. *: संजय पेडणेकर, माजी नगरसेवक*

सावंतवाडीची रक्तपेढी कंत्राटी महिलेच्या जीवावर सुरु आहे. शल्य चिकित्सकांनी कुडाळ येथील महिला तंत्रज्ञांना आदेश देऊन देखील‌ त्या हजर झालेल्या नाहीत. याचा अर्थ जिल्हा शल्य चिकित्सकांच्या आदेशाला त्यांनी केराची टोपली दाखवली असाच होतोय. मात्र, यात रूग्णांसह जनसामान्यांच नुकसान होत आहे. एखाद्याचा जीव धोक्यात येत आहे. २४ तास एकच महिला रक्तपेढी सांभाळत असेल तर ही रक्तपेढी बंद करायची वेळ येणार आहे. गेले सहा महिने अशीच परिस्थिती आहे. आम्ही कितीही रक्तदाते उभे केले तरी स्फाटच नसल्यानं त्याचा काहीही उपयोग होत नाही. रूग्णांच्या नातेवाईकांचे होणारे हाल व त्यांच्यावर ओढावत असलेला प्रसंग सांगण कठीण आहे. त्यामुळे आदेश देऊन देखील‌ तंत्रज्ञ हजर होत नसतील तर त्यांच्यावर कारवाई होण गरजेच आहे. अन्यथा यामागे काहीतरी शिजतंय असं म्हणावं लागेल. त्यामुळे शल्यचिकित्सकांनी संबंधितांवर कारवाई करत दोन्ही पदांवर तंत्रज्ञांची भरती करावी. सात दिवसांत सावंतवाडीतील ही पद भरली न गेल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल त्याला प्रशासन व जिल्हा शल्य चिकित्सक जबाबदार राहतील *: देव्या सुर्याजी, अध्यक्ष, युवा रक्तदाता संघटना*

एकंदरीतच, एकीकडे अन्न व औषध प्रशासनानं स्पॉट टेस्ट ऐवजी एलायजा टेस्ट बंधनकारक केल्यानं १० ते २८ रक्तदात्यांशिवाय ब्लड घेण शक्य नाही आहे. सामाजिक संघटना, रक्तादाते, रूग्णांचे नातेवाईक यासाठी स्वतःहून पुढाकार घेत असताना रक्तपेढीत कर्मचारीच उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ब्लड बँक वाऱ्यावर पडली असून कंत्राटी कर्मचाऱ्यांना २४ तास सेवा द्यावी लागत आहे‌. त्यामुळे ब्लड बँक बंद होण्याच्या मार्गावर आली आहे. कर्मचारी नसल्यानं ब्लड देखील उपलब्ध होत नसून रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी जिल्हा रूग्णालय ओरोस किंवा गोवा बांबोळीला रक्तासाठी वणवण करावी लागत आहे. येत्या सात दिवसांत पद न भरली गेल्यास व परिस्थिती न सुधारल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा युवा रक्तदाता संघटनेनं दिला आहे.