
दोडामार्ग; दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा तिलारीचा कालवा फुटून शेतकर्यांचा एनवेळी घात करण्याचा प्रकार जलसंपदा विभागाच्या निष्काळजी पणामुळे घडला आहे. तेरवण मेढे उन्नेयी बंधार्यातून सोडण्यात येणार्या पाण्याच्या कालव्याला भटवाडी येथे भगदाड पडण्याची घटना बुधवारी घडली आहे. त्यामुळे तिलारीत जलसंपदा विभागाचे कालवे म्हणजे अत्यंत बे भरवशाचे आणि शेतकर्यांचे मुळावर उठणारे ठरत आहेत. दरवर्षी या प्रकल्पाच्या कालवा फुटीचे ग्रहण वाढतेच असून केवळ ठेकेदार आणि अधिकारी यांची पोठ भरण्यासाठी नको त्या ठिकाणी कोट्यवधींची कामे केली जात असल्याने सर्वसामान्य नागरिक व या कालव्यांच्या पाण्यावर शेती करणार्या नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त आहे.
तिलारी धरणामुळे दोडामार्ग तालुका आणि गोवा राज्यात हरितक्रांतीची मोठी स्वप्न पाहण्यात आली होती. अडीच हजारहून अधिक कोटी रुपये खर्चून महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांनी संयुक्तपणे उभारलेल्या या प्रकल्पातून दर्जाहीन कालव्यांमुळे अद्याप एकही वर्ष नियमित पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. तिलारी धरणामुळे धरणाखालील दोडामार्ग तालुका व गोवा राज्यातील शेतकर्यांनी हरितक्रांतीची मोठी स्वप्न पहिली होती. मात्र त्यांचा पक्का विश्वासघात करण्याचे काम तिलारी प्रकल्पात वर्षानुवर्षे काम करणारे ठेकेदार व भ्रष्ट अधिकारी यांच्यामुळे झाला आहे. धरण काम पूर्ण झाल्याने धरणात जारी अमाप पाणीपुरवठा असला तरी तो नियमित शेतकर्यांच्या शेत बांधावर नेण्यात तिलारी प्रकल्प अधिकारी सपशेल अपयशी ठरले आहेत. गेल्या 15 वर्षात कालव्यात पाणी सोडलेपासून सातत्याने या ना त्या ठिकाणी कालवे फुटतच आहेत. आणि जिथे कालवा फुटतो तिथे नवीन काम केले जाते. मात्र संपूर्ण कालव्याचा दर्जा तपासून एकाच वेळी 25-30 वर्षे झालेल्या या कालव्यांचे दर्जेदार व नियोजन बद्ध नूतनीकरण करणेकडे दुर्लक्ष केला जात आहे, बुधवारी पुन्हा एकदा भटवाडी-घोडगेवाडी दरम्यान भगदाड पडलेल्या कालव्यामुळे तिलारी कालव्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जो कालवा फुटला तो तेरवण मेढे उन्नेयी बंधार्यातून सोडण्यात येणार्या पाण्याचा असला तरी तिलारीच्या सर्वच कालव्यांची अवस्था दयनीय आहे. एकूण लांबीच्या ८० टक्के कालवे हे नावाला राहिले आहेत. कालव्याच्या आतून केलेलं पक्क बांधकाम पूर्णत ढासळल्याने जोपर्यंत या संपूर्ण कालव्यांचे नूतनीकरण होत नाही तोपर्यंत तिलारीच्या कालवा फुटीचे ग्रहण सुटणे अवघड आहे.