तिलारी घाटातून दोन दिवसात एसटी सुरु होणार ?

Edited by: लवू परब
Published on: December 17, 2024 18:37 PM
views 173  views

दोडामार्ग : तिलारी घाटातून एसटी बस सेवा सुरू न झाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी कोदाळी येथे बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनास दिला. त्यानंतर प्रशासन जागे होत, एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी घाटाची एसटी घेऊन प्रत्यक्ष पाहणी करत घाट वाहतुकीस योग्य असल्याचे सांगितले. तसेच येत्या दोन दिवसांत घाटातून एसटी सुरू करण्यासंदर्भात हिरवा कंदील दाखविला.

तिलारी घाटातून चाळीस वर्षे बिनदिक्कतपणे सुरू असलेली एसटी सेवा यंदाच्या पावसाळ्यात बंद ठेवण्याचे आदेश चंदगड बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारावर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे एसटीला देखील या मार्गाने वाहतूक करण्यास प्रतिबंध झाला. गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या एसटीमुळे स्थानिकांचे हाल झाले. शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, वृद्ध - कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांची ससेहोलपट झाली. त्यामुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन तिलारी घाटातून बस सेवा सुरु करण्याचे निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना दिले होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी येथील स्थानिकांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण छेडले होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रांत व संबंधित कार्यालयाचे अधिकारी यांना घाट रस्त्याची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गडहिंग्लज प्रांताधिकारी एकनाथ कलबांडे सोबत सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, एसटी महामंडळाचे अधिकारी, आरटिओ विभागाचे अधिकारी यांनी दोन‌ महिन्यांपुर्वी घाटातून एसटी बस उतरवून प्रात्यक्षिक घेतले होते. एसटी सुरू न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला होता.

दोन‌ महिने उलटूनही एसटी बस चालु करण्याच्या दृष्टीने कोणतीही कार्यवाही झाली नाही. प्रशासनाच्या या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. तिलारी घाटातून मंगळवारपर्यंत एसटी बस सुरू करावी. अन्यथा बुधवारी तिलारी घाटाच्या माथ्यावर कोदाळी येथे आंदोलन छेडण्याचा इशारा स्वराज्य सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, कोदाळी माजी सरपंच अंकुश गावडे, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिकांनी प्रशासनास दिला. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. एसटी विभागाचे अधिकारी अनंत चिले, चालक, वाहक यांनी सोमवारी तिलारी घाट रस्त्याची पाहणी केली.  हा रस्ता एसटी वाहतुकीस योग्य असल्याचे सांगत येत्या दोन दिवसात घाटातून एसटी बस पूर्ववत सुरू करण्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रवीण गवस, अंकुश गावडे, दत्ताराम देसाई यांसह सामाजिक कार्यकर्ते व स्थानिकांच्या प्रयत्नांना यश आले असून लवकरच सर्वसामान्यांची लालपरी घाटातून सुरू होणार आहे.